Join us

कोरोना केंद्रांमध्येही होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:16 AM

मुंबई : मुंबईत लसीकरण प्रक्रियेचा आवाका पाहता आता रुग्णालयांसह कोरोना केंद्रांनाही लसीकरण प्रक्रियेत सहभागी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला ...

मुंबई : मुंबईत लसीकरण प्रक्रियेचा आवाका पाहता आता रुग्णालयांसह कोरोना केंद्रांनाही लसीकरण प्रक्रियेत सहभागी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, नेस्को, वांद्रे-कुर्ला संकुल आणि एनएससीआय येथील कोरोना केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून या केंद्रांमध्ये लसीकरणासाठी २५ कक्ष उभारण्यात येणार आहेत.

केंद्राकडून लसीला मान्यता मिळाल्यानंतर कोणत्याही क्षणी लस उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे यासाठी पालिका यंत्रणाकडून मोठ्या प्रमाणात पूर्वतयारी सुरू आहे. गोरेगाव नेस्को कोविड सेंटरमध्ये १० कक्ष उभारले जाणार आहेत. यात लस साठवणूक कक्ष, लस टोचण्यासाठीची रूम आणि एक रुग्ण देखरेख रूम असे हे युनिट असणार आहे. आजपासूनच हे युनिट तयार करण्यास आम्ही सुरुवात केली असून आठवड्याभरात काम पूर्ण होईल, अशी माहिती नेस्को कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंड्राडे यांनी दिली आहे. तर बीकेसी असे १५ कक्ष उभारण्यात येणार असल्याचे केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र डेरे यांनी सांगितले.

मुंबईत पहिल्या टप्प्यात अंदाजे दीड लाख कोरोना योद्ध्यांना लस दिली जाणार आहे. तर त्यानंतर सुमारे पाच लाख फ्रंटलाइन कोरोना वॉरिअर्सना लस टोचली जाणार आहे. पालिकेतर्फे आठ लसीकरण केंद्र उभारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र त्यासह मोठ्या कोरोना केंद्रातही लसीकरणासाठी सेवा उपलब्ध करण्यात यावी या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.