मुंबई : मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे लसीकरणावर अधिक भर देण्यात आला. पण आता लसीचा अधिक तुटवडा भासत असल्यामुळे अनेक खासगी रुग्णालयात लसीकरण बंद असल्याचे समोर आले. तसेच आज मुंबईत लसीकरण मोहिमेची उशिरा सुरुवात झाली. पण आता मुंबईतील लसीकरणासाठी वॉक इन सिस्टम बंद होणार असून लसीचा साठा नसल्यामुळे पुढील ३ दिवस मुंबईत लसीकरण मोहीम बंद राहणार असल्याची माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
केंद्र शासनाकडून जो लसीचा साठा मिळतो, तो बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. सकाळी लसींचे वाटप केले. त्यामुळे लसीकरण मोहीम १२ वाजल्यानंतरला सुरुवात होईल. तसेच ज्यांचा लसीचा दुसरा डोस आहे, त्यांनाच लस देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. ज्या लोकांनी ऑनलाईन नोंदणी केली, त्यांचा जास्त विचार केला येईल, असे सांगूनही लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली हे सत्य आहे. त्यामुळे संसर्गाचा धोकाही संभावू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे, असेही काकाणी यांनी नमूद केले.
दरम्यान लसीचा साठा संपत आलेला आहे, त्यामुळे पुढील ३ दिवस लसीकरण मोहीम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अशा परिस्थिती लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. काकाणी म्हणाले, मुंबईतील सर्वच केंद्रावर लसीकरण बंद राहिले. रात्री मोजकाच लसीचा साठा मिळाला होता. ७६ हजार डोसेस मिळाले आहेत, यापैकी दुपारपर्यंत ५० हजारांहून अधिक लसीचे डोस संपले आहेत. सर्व केंद्रांवर लसीकरण मोहीम पुढील साठा मिळेपर्यंत बंद राहील, अशी माहिती काकाणी यांनी दिली.
वॉक इन लसीकरण बंद
शहर उपनगरातील वॉक इन लसीकरण लसीकरण केंद्रांबाहेर होणारी गर्दी टाळण्यासाठी ज्यांनी रजिस्ट्रेशन केले त्यांनाच फक्त लसीकरणाच्या मोहिमेत सामावून घेतले जाणार आहे. वॉक इन सिस्टिम बंद केली जाईल आणि महत्त्वाचे म्हणजे ज्यांचा दुसरा डोस आहे, त्यांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी रजिस्ट्रेशन करा, अशी विनंती आहे. तसेच लसीचा दुसरा डोस असेल तर केंद्रावर जावे.