दिंडाेशी प्रभाग क्रमांक ४१ मध्ये तरुणांसाठी लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:06 AM2021-05-12T04:06:09+5:302021-05-12T04:06:09+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दिंडोशी प्रभाग क्रमांक ४१ मधील संतोषनगर येथील नव्या महापालिका शाळेत १८ ते ४४ वयाेगटासाठी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिंडोशी प्रभाग क्रमांक ४१ मधील संतोषनगर येथील नव्या महापालिका शाळेत १८ ते ४४ वयाेगटासाठी मंगळवारपासून लसीकरण सुरू झाले आहे.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभाग क्रमांक ४१चे नगरसेवक तुळशीराम शिंदे यांच्या प्रयत्नांनी संतोषनगर येथील महापालिका शाळेत हे लसीकरण सुरू झाले आहे.
पहिल्याच दिवशी या वयोगटातील सुमारे १०० तरुणांनी पूर्वनोंदणी करून लस घेतली. या लसीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा साेमवारी आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला. या वयोगटातील नागरिकांसाठी सुरू होणारे हे दिंडोशीतील पहिलेच लसीकरण केंद्र आहे.
संतोषनगर, नागरी निवारा, न्यू म्हाडा, शिवशाही परिसरातील हजारो तरुणांना या केंद्राचा लाभ होणार आहे. या केंद्रात सकाळी ९ ते ५ यावेळेत लसीकरणासाठी आधी ऑनलाइन नोंदणी केलेल्या व १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस घेता येईल.
आमदार सुनील प्रभू म्हणाले की, स्थानिक नगरसेवक तुळशीराम शिंदे यांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यामुळे वयोगट १८ ते ४४ वयाेगटासाठी मोफत लस मिळणार आहे. राज्य शासन व मुंबई महानगरपालिका आणि अनेक सेवाभावी संस्था व राजकीय पक्ष कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मोठे योगदान देत असल्याचे गौरवोद्गार आमदार सुनील प्रभू यांनी यावेळी काढले.
या प्रभागातील या वयोगटातील जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरणासाठी ॲपवर पूर्वनोंदणी करून लस घ्यावी. तसेच कोविड-१९ पासून बचावासाठी मास्क नियमित वापरा, वारंवार हात धुवा, सुरक्षित अंतर राखा या त्रिसूत्रीचे तंतोतंत पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले.
यावेळी मुंबईचे उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, विधानसभा संघटक प्रशांत कदम, महिला विधानसभा समन्वयक आशा केणी, उपविभागप्रमुख भाई परब, विधानसभा समन्वयक प्रशांत घोलप, महिला विधानसभा संघटिका विद्या गावडे तसेच पी-उत्तर विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. ऋतुजा बारस्कर, कार्यकारी अभियंता शिवकांत डोके, शाखाप्रमुख संपत मोरे, महिला शाखा संघटिका सुनंदा सपकाळ, मीनल साळवी, नयना मगर, अनिल देसाई, सर्व विभागातील शिवसैनिक उपस्थित होते.
-------------------------------------------