लसीचा गर्भवतीच्या नाळेवर दुष्परिणाम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:06 AM2021-05-14T04:06:55+5:302021-05-14T04:06:55+5:30
द जर्नल ऑब्स्टेट्रिक्स अँड गायन्कोलाॅजीचा अहवाल स्नेहा मोरे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केंद्र शासनाच्या लसीकरणविषयक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, गर्भवती ...
द जर्नल ऑब्स्टेट्रिक्स अँड गायन्कोलाॅजीचा अहवाल
स्नेहा मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र शासनाच्या लसीकरणविषयक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, गर्भवती लस घेऊ शकत नाहीत. मात्र, नुकत्याच द जर्नल ऑब्स्टेट्रिक्स अँड गायन्कोलाॅजीचा अहवालातील निरीक्षणांनुसार, कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या गर्भवतींच्या नाळेवर लसीमुळे कोणताही दुष्परिणाम झालेला नसल्याचे समोर आले आहे. गर्भवतींसाठी लस सुरक्षित आहे, हे पाहण्यासाठी नाळेवर कोणताही दुष्परिणाम झालेला नाही, हे पाहणे महत्त्वाचे असते. गर्भावस्थेत नाळ हा महत्त्वाचा घटक मानला जातो, अशी माहिती स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिली आहे.
अमेरिका, ब्राझील या देशांत गर्भवतींना लस देण्यात येत आहे. मात्र, भारतात या गटाला लस देण्यास परवानगी नाही. याविषयी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मालिनी शाह यांनी सांगितले, गर्भवतीची नाळ ही विमानातील ब्लॅक बाॅक्सप्रमाणे असते. लसीचा काहीही विपरीत परिणाम झाल्यास त्या नाळेच्या आरोग्यावरून आपल्याला ही बाब पडताळता येते. त्यामुळे हा अहवाल प्रकाशित होण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञांच्या राष्ट्रीय संघटनेने केंद्र शासनाला गर्भवतींच्या लसीकरणाविषयी निवेदन दिले आहे. मात्र, त्याविषयी पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.
गर्भवतींना लस द्या, स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेची मागणी
‘फॉग्सी’ (Federation of Obstetric and Gynecological Society of India) देशभरातील स्त्रीरोगतज्ज्ञांची सर्वांत मोठी संघटना आहे. गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या लसीकरणाबाबत ‘फॉग्सी’ने एक पत्रक जारी केले आहे, त्यातील प्रमुख निरीक्षणे व मागण्या
- गर्भवती महिला, स्तनदा मातांना लस देण्यात यावी. लशीची सुरक्षा त्यांनाही मिळाली पाहिजे.
- महिलांना त्यांचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असावे. स्त्रीरोगतज्ज्ञांना लस देण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून योग्य काळजी घेता येईल.
- शास्त्रीय माहितीनुसार, लशीचा गर्भावर किंवा जन्माला येणाऱ्या बाळावर प्रतिकूल परिणाम होत नाही.
- आईच्या दुधावर असलेल्या बाळावर लसीचा प्रतिकूल परिणाम होत नाही. त्यामुळे स्तनदा मातांना लस मिळाली पाहिजे.
- या निर्णयाचा ५० दशलक्ष लोकांवर परिणाम होणार आहे.
अर्भकाला केवळ आईकडून प्रतिपिंड
अमेरिकेच्या द जर्नल ऑब्स्टेट्रिक्स अँड गायन्कोलाॅजीचा अहवालानुसार, कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर गर्भवतींच्या शरीरात प्रतिपिंड निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. त्यात कोणताही धोका संभवलेला नाही. शिवाय हे प्रतिपिंड गर्भातील अर्भकाला मिळत असल्याचे दिसून आले आहे. अर्भकाला केवळ आईकडूनच प्रतिपिंड मिळू शकतात.
* केंद्र शासनाला तज्ज्ञांची शिफारस
मुंबई : राष्ट्रीय तज्ज्ञांच्या गटाने म्हणजेच National Expert Group on Vaccinationn Administration यांनी गर्भवती महिलांसाठी देखील लस घेण्याची मुभा असावी असा सल्ला दिला आहे. गर्भवती महिलांना लस घेता येईल आणि स्तनदा मातांना प्रसुतीनंतर लस घेता येईल, अशी शिफारस केंद्र शासनाकडे केली आहे.
--------------------------------------------------------------