७१पैकी ६२ खासगी रुग्णालयात १२ एप्रिलपासून पुन्हा लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लसींचा साठा उपलब्ध झाल्याने ७१ पैकी ६२ खासगी रुग्णालयात १२ एप्रिलपासून पुन्हा लसीकरण सुरू होणार आहे. महापालिका आणि शासनातर्फे ४९, तर खासगी रुग्णालयात ७१ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून प्रतिदिन ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते.
लसीकरणासाठी मंजुरी मिळालेल्या ७१ खासगी रुग्णालयात १० एप्रिल आणि ११ एप्रिल असे दोन दिवस लसीकरण थांबले होते, तर पालिकेच्या, शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू होते. ९ एप्रिल रोजी रात्री उशिरा ९९ हजार लसी आणि १० एप्रिल रोजी एक लाख ३४ हजार ९७० अशा एकूण दोन लाख ३३ हजार ९७० लसींच्या मात्रा मागील दोन दिवसांत उपलब्ध झाल्या आहेत. त्यातून खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्रासाठी लस साठा वितरित करण्यात आला आहे. यामुळे १२ एप्रिल रोजी नियमित वेळेत ७१पैकी ६२ खासगी लसीकरण केंद्र कार्यान्वित राहतील.