लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे ठप्प असलेल्या पर्यटन व्यवसायाला गती देण्यासाठी सहल आयोजकांनी अनोखी शक्कल लढवली आहे. परदेशात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबरोबरच सहलीचा आनंद लुटण्यासाठी विशेष पॅकेज तयार केले जात आहे. भारतीय लसीकरणातील अडथळ्यांमुळे ही योजना यशस्वी ठरेल, असा विश्वास या पर्यटन कंपन्यांना आहे.
मुंबई, दिल्ली आणि दक्षिणेकडील राज्यांतील काही कंपन्या या पॅकेजवर काम करत आहेत. दिल्लीतील एका पर्यटन कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावाला भारत आणि रशियाकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार २४ दिवसांच्या सहल काळात स्फुतनिक लसीचे दोन डोस पर्यटकांना घेता येतील. अलीकडेच ३० व्यक्तींची पहिली तुकडी लस पर्यटनासाठी रवाना झाली. २९ मे रोजी दुसऱ्या खेपेसाठीचे बुकिंग फुल्ल झाले आहे.
मुंबईस्थित एका पर्यटन कंपनीतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध शिथील होण्याची वाट आम्ही पाहत आहोत. त्यानंतर मुख्यत्वे संयुक्त अरब अमिराती, अमेरिका आणि रशियात पर्यटनाबरोबरच लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. दीड ते दोन लाखात लस पर्यटनाचा आनंद नागरिकांना घेता यावा, हा यामागील उद्देश आहे. यासंबंधीच्या आराखड्यावर काम सुरू असून, निर्बंध शिथील होताच अंमलबजावणी केली जाईल.
...........
या पर्यायांवर चर्चा...
कॅलिफोर्निया, लोवा, लुसियाना, मार्यलॅंड, नेवाडा या देशांत लसीकरणासाठी राष्ट्रीयत्त्वाचा पुरावा मागितला जात नाही. त्यामुळे येथे पर्यटकांच्या लसीकरणात फारशा अडचणी येणार नाहीत. दुबईत निर्बंध लागू करण्याआधी बाहेरील पर्यटकांना लसीकरणाचा लाभ घेता येत होता. शिथिलीकरणानंतर तेथे पुन्हा तशी सुविधा उपलब्ध होऊ शकेल. शिवाय न्युयॉर्कमध्येही लसीकरणावर फारसे निर्बंध नसल्याने या सर्व पर्यायांवर विचार सुरू असल्याचे एका खासगी पर्यटन कंपनीतील अधिकाऱ्याने गोपनियतेच्या अटीवर सांगितले.