पाचवरून ३.२ टक्क्यांवर; आराेग्य विभागाची माहिती
स्नेहा मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सहव्याधी असणाऱ्या सामान्य नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर लस वाया जाण्याचे प्रमाण पाच टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांवर आले, अशी माहिती सार्वजनिक आराेग्य विभागाने दिली आहे. मुंबईतही हे प्रमाण १ ते २ टक्क्यांवर आले आहे. वाॅक इन लसीकरणामुळे लस वाया जाण्याचे प्रमाण कमी झाल्याची माहिती पालिकेच्या आराेग्य विभागाने दिली.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत ९० हजार लसींचे डोस वाया गेले. याचे प्रमाण १० टक्के असल्याची माहिती लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिली. लस वाया गेल्याचे प्रमाण लक्षात घेऊन नवीन डोसचा साठा जिल्ह्यांना पुरविण्यात येणार आहे. कोविशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिन लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण सुरुवातीला अधिक असल्याचे दिसून आले. कोविशिल्डच्या एका बाटलीत १० डोसची क्षमता आहे, तर कोव्हॅक्सिनमध्ये २० डोसची क्षमता आहे. परिणामी, सुरुवातीच्या दिवसात यामुळे जे.जे. रुग्णालयात कोव्हॅक्सिन वाया जाण्याचे प्रमाण अधिक होते. परंतु मार्च महिन्यापासून कोव्हॅक्सिन लसीच्या एका बाटलीत केवळ १० डोसची क्षमता असलेला नवीन साठा उपलब्ध झाला. त्यामुळे लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण कमी झाले.
आतापर्यंत मुंबईत दर दिवसाला ४५ हजार लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र लवकरच हे प्रमाण लाखांच्या घरात जाण्यासाठी वेगाने प्रयत्न करत असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. सहव्याधी असलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण मे महिन्याच्या अखेरीस संपविण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुंबईतील प्राधान्यक्रम असणाऱ्या गटात ३० लाख नागरिकांपैकी ६ लाख नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला.
.........................