Join us

दोन दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईत शुक्रवारी मिळणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लसींचा साठा संपुष्टात आल्याने मुंबईत बुधवारी लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आली होती. मात्र महापालिकेला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लसींचा साठा संपुष्टात आल्याने मुंबईत बुधवारी लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आली होती. मात्र महापालिकेला लवकरच केंद्रातून ६१ हजार दोनशे लसींचा साठा उपलब्ध होणार आहे. या लसींचे वितरण आज, गुरुवारी सर्व पालिका आणि सरकारी केंद्रांना केले जाणार आहे. त्यामुळे उद्या, शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील लसीकरण मोहीम पुन्हा एकदा सुरू होणार आहे.

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ६५ लाख ६७ हजार ३२४ नागरिकांनी लस घेतली आहे. लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे मंगळवारी पालिका आणि सरकारी ५८ निवडक केंद्रांवर लसीकरण पार पडले. दिवसभरात ४२ हजार नागरिकांनी लस घेतली. यापैकी खासगी रुग्णालयांत लस घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. मात्र लसींचा साठा संपुष्टात आल्याने आज, गुरुवारी लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात येणार आहे.

लवकरच कोविशिल्डचे ५० हजार, तर कोवॅक्सिनचे ११ हजार २०० असे एकूण ६१ हजार २०० डोस प्राप्त होणार आहेत. हा लससाठा उपलब्ध झाल्यानंतर त्याचे गुरुवारी दिवसभरात वितरण केले जाणार आहे. यामुळे गुरुवारी नागरिकांना लस देण्यात येणार नाही. मात्र शुक्रवारपासून मुंबईतील सर्व पालिका आणि सरकारी केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.