Join us

‘ड्राइव्‍ह इन लसीकरण’अंतर्गत आजी-आजोबांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिकेच्या जी/उत्‍तर विभागात ‘ड्राइव्‍ह इन लसीकरण’ माेहिमेअंतर्गत रविवारी ९९ वर्षीय आजोबा रतन मीर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महापालिकेच्या जी/उत्‍तर विभागात ‘ड्राइव्‍ह इन लसीकरण’ माेहिमेअंतर्गत रविवारी ९९ वर्षीय आजोबा रतन मीर आणि ९८ वर्षीय आजी नलिनी माने यांचे लसीकरण करण्यात आले. याव्यतिरिक्त दादर, कोहिनूर वाहनतळ येथे मातृदिनही साजरा करण्यात आला. दुसरीकडे अजय नायक या तरुणाने आपले ९७ वर्षांचे आजोबा माधव प्रभू यांचे नुकतेच लसीकरण करून घेतले. केईएम लसीकरण केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी या ९७ वर्षांच्या आजोबांना आपुलकीने आणि प्राधान्याने लस दिली. डॉक्टर, कर्मचारी आणि रांगेत प्रतीक्षेत असलेल्या लोकांनी नातू-आजोबांच्या उत्साहाचे कौतुक केले.

ज्‍येष्‍ठ नागरिक आणि दिव्‍यांग व्‍यक्तींना कोविड प्रतिबंधक लस घेण्‍यासाठी सहज, सोपी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जी/उत्‍तर विभागाने ड्राइव्‍ह इन लसीकरण सुविधा ४ मे पासून कोहिनूर वाहनतळ येथे सुरू केली आहे. या उपक्रमास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. कोविड संसर्ग मुंबईत वाढीस लागल्‍यानंतर दादर (पश्चिम) परिसरातील जे. के. सावंत मार्गावरील कोहिनूर वाहनतळ येथे जी/उत्‍तर विभाग कार्यालयाने ड्राइव्‍ह इन कोविड चाचणी केंद्र सुरू करण्यात आले हाेते. या केंद्राच्‍या माध्‍यमातून दादर परिसरातील चाचण्‍यांना वेग देण्‍यास मोठी मदत झाली होती. त्यानंतर ड्राइव्‍ह इन कोविड प्रतिबंध लसीकरण केंद्र सुरू करण्‍याचा निर्णय जी/उत्‍तर विभागाचे सहायक आयुक्‍त किरण दिघावकर यांनी घेतला.

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी रुग्‍णालयांमध्‍ये निर्देशित केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांना सर्व प्रक्रिया पार पडेपर्यंत काही वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते. लस घेतल्‍यानंतर त्‍यांना निरीक्षणाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत थांबावे लागते. काही प्रसंगी अशी स्थिती ज्‍येष्‍ठ नागरिक तसेच दिव्‍यांग व्‍यक्तींसाठी गैरसोयीची ठरू शकते. त्‍यामुळे यावर मध्‍यममार्ग म्‍हणून ‘ड्राइव्‍ह इन लसीकरण’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत ज्‍येष्‍ठ नागरिक, दिव्‍यांगांची चांगली साेय झाली आहे. लस घेण्‍यासाठी बूथपासून किमान ५० वाहने एकाच वेळी रांगेत थांबू शकतील आणि निरीक्षण कालावधी पूर्ण करेपर्यंत किमान १०० वाहने एकाच वेळी एकाच ठिकाणी थांबू शकतील इतकी जागा या ठिकाणी उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे.

.........................