Join us

चर्चगेट स्थानकात व्हॅक्युम टॉयलेट

By admin | Published: June 06, 2016 2:54 AM

पश्चिम रेल्वेने रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. पण, काहीवेळा फलाटावर शौचालय नसणे, दूर कोपऱ्यात शौचालय असल्यामुळे त्रास होतो. प्रवाशांच्या या समस्या सोडविण्यासाठी

मुंबई : पश्चिम रेल्वेने रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. पण, काहीवेळा फलाटावर शौचालय नसणे, दूर कोपऱ्यात शौचालय असल्यामुळे त्रास होतो. प्रवाशांच्या या समस्या सोडविण्यासाठी राईट टू पी आणि परे एकत्र काम करत आहे. चर्चगेट स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे येथे पुढच्या तीन महिन्यांत व्हॅक्युम टॉयलेट बसवण्यात येणार असल्याची माहिती ‘राईट टू पी’कडून (आरटीपी) मिळाली आहे. व्हॅक्युम टॉयलेटमध्ये पाण्याचा वापर होत नाही. त्यामुळे पाण्याचा वापर कमी होणार आहे. चेन्नई नम्मान टॉयलेट मुंबईतील पाच परेच्या स्थानकांवर बसवण्यात येणार आहेत. बोरीवली, अंधेरी आणि वांद्रे स्थानकांवर ही टॉयलेट बसवण्यात येणार आहेत. या टॉयलेटमुळे वृद्ध आणि अपंगांचा त्रास कमी होईल. या पद्धतीने टॉयलेटची रचना आहे, असे आरटीपी कार्यकर्त्या सुप्रिया सोनार यांनी सांगितले. आरटीपीने केलेल्या सर्वेक्षणात २० स्थानकांवरील महिला मुताऱ्या बंद असल्याचे आढळून आले होते. या मुताऱ्या एका बाजूला असल्यामुळे त्यांना कुलूप लावले जाते, असे सांगण्यात आले. या कुलुपांची चावी स्टेशन मास्तर कार्यालयात ठेवलेली असते. त्यामुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी शौचालय पाहणाऱ्यांकडेच चावी ठेवावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्या स्थानकांवर एकाकी ठिकाणी शौचालये आहेत, ती बंद करण्यात येणार आहेत. स्थानकाच्या प्रवेशद्वारांजवळ शौचालये असतील अशी सोय करण्यात येणार असल्याचेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आल्याचे सुप्रिया यांनी सांगितले. दीड महिन्याने पुन्हा बैठक होणार असून, ‘परे’वरील शौचालयांचे काम कुठपर्यंत आले आहे, याचा आढावा घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)