मुंबई : ‘इंडिया’ बैठकीसाठी देशभरातील २६ पक्षांचे नेते मुंबईत दाखल होत असून त्यांच्यासाठी सांताक्रूझ वाकोला येथील ग्रॅण्ड हयात या पंचतारांकित हॉटेलसह विमानतळालगतच्या इतर पंचतारांकित हॉटेल्समध्ये १५० खोल्या आरक्षित केल्या आहेत.
बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांच्या निवास व्यवस्थेची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे. त्याचबरोबर पहिल्या दिवशी उद्धव ठाकरेंनी स्नेहभोजनाची व्यवस्था केली आहे. यात पाहुण्यांना महाराष्ट्रीय पदार्थांची चव चाखता येणार आहे. जेवणात पुरणपोळी, झुणका-भाकर, वडापाव असा खास बेत असेल.
कुणाकडे काय जबाबदारी? १ सप्टेंबर रोजी दुपारच्या जेवणाची व्यवस्था काँग्रेसने केली आहे. या बैठकीच्या प्रसिद्धीची जबाबदारीही काँग्रेसकडे आहे. तर पाहुण्यांसाठी लागणाऱ्या वाहनांच्या व्यवस्थेची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने उचलली आहे. पत्रकार परिषदेची जबाबदारी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याकडे आहे.