दीपक भातुसेमुंबई : अजित पवार राज्य मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. या पदावर विदर्भातील काँग्रेसच्या आमदाराची नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
विदर्भातील काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, सुनील केदार आणि यशोमती ठाकूर यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी सध्याच्या प्रबळ सत्तापक्षाचा सामना करायचा असेल तर अनुभवी विरोधी पक्षनेता द्यावा, असा आग्रह धरला आहे. वडेट्टीवार यांचे नाव या पदासाठी आघाडीवर असल्याचे समजते. वडेट्टीवार यांनी यापूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते. त्यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळाला होता.पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदाचे नाव दिले जाईल, अशी शक्यता होती. मात्र, काँग्रेसने हे नाव अद्याप दिले नसल्याने विधानसभेतील अधिवेशनाचा पहिला दिवस विरोधी पक्षनेत्याविना गेला.
प्रदेशाध्यक्ष बदलणार?प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विदर्भातील असून विधानसभेतील विरोधी पक्षनेताही विदर्भातील झाला तर दोन महत्त्वाची पदे विदर्भाकडे जातील. अशा वेळी प्रदेशाध्यक्ष बदलला जाऊ शकतो. तसे झाले तर या पदासाठी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सतेज पाटील यांची चर्चा आहे.