वेगाला कारवाईचा लगाम! रोज ३ हजार ६५५ चालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:58 AM2018-06-05T00:58:51+5:302018-06-05T00:58:51+5:30
शहरात अतिवेगाने वाहन चालविणा-यांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. यामुळे वाहतुकीचे नियम मोडणा-यांसह अतिवेगाने वाहन चालविणारेदेखील वाहतूक पोलिसांच्या रडारवर आहेत.
मुंबई : शहरात अतिवेगाने वाहन चालविणा-यांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. यामुळे वाहतुकीचे नियम मोडणा-यांसह अतिवेगाने वाहन चालविणारेदेखील वाहतूक पोलिसांच्या रडारवर आहेत. शहरात अतिवेगाने वाहन चालविणाºया ३ हजार ६५५ वाहन चालकांवर रोज ई-चलानच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे.
शहरात अतिवेगाने वाहन चालवत ‘कट’ मारण्याचे प्रकारही घडतात. अशा वेळी तोल गेल्यामुळे जीवघेणे अपघात होतात. जानेवारी ते मे या कालावधीत वाहतूक पोलिसांनी अशा एकूण ४ लाख ४९ हजार २६९ वाहनांना चलान जारी केले आहे. यापैकी सर्वाधिक चलान हे मे महिन्यात जारी करण्यात आले आहेत. मेमधील ३१ दिवसांत सर्वाधिक १ लाख १३ हजार ३२३ वाहनचालकांविरोधात चलान काढण्यात आले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत मुंबई शहरातील वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यातील एकूण वाहनांपैकी ३१.७९ लाख वाहने मुंबईत आहेत. एकीकडे वाढत्या वाहनांमुळे वाहतूककोंडी होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दुचाकी चालवणाºयांच्या संख्येत ८.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
२०१७मध्ये मुंबईत ३ हजार १६० अपघातांचे गुन्हे नोंदविण्यात आले होते. या अपघातांमध्ये ४९० नागरिकांचा मृत्यू झाला होता तर ३ हजार २८७ नागरिक जखमी झाले होते. वाहन चालकांकडून नियम मोडणे, अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे त्याचा वाईट परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागतो. यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, पोलिसांच्या संकेतस्थळाला भेट देत आपल्या वाहनांवर चलान बाकी असल्यास त्वरित दंड भरावा, असे आवाहन केले आहे.
महिना चलान
जानेवारी १,०४,७९४
फेब्रुवारी ३७,८५४
मार्च ८७,३०४
एप्रिल १,०५,९९४
मे १,१३,३२३
एकूण ४,४९,२६९