राणेंच्या रुग्णालयात किती रुपयांत कोरोना टेस्ट केली जाते हे सांगावं, नाईकांचं थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 06:46 PM2020-09-26T18:46:49+5:302020-09-26T18:55:58+5:30
राजकीय फायद्यासाठी नितेश राणे व त्यांचे भाजपाचे सहकारी सरकारी आरोग्य व्यवस्थेची बदनामी करत आहेत, असा घणाघात नाईक यांनी केला आहे.
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रकोप वाढतच चालला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनाही कोरोनानं विळख्यात घेतलं आहे. सिंधुदुर्गातील सरकारी आरोग्य व्यवस्थेवरही कणकवलीचे आमदार नितेश राणे सडकून टीका करत आहेत. आता त्यांच्या टीकेला थेट कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या आरोपांचा शिवसेनेचे कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी लांबलचक प्रसिद्ध पत्रक काढून समाचार घेतला आहे. स्वत:च्या हॉस्पिटलचा व्यवसाय वाढविण्यासाठी व राजकीय फायद्यासाठी नितेश राणे व त्यांचे भाजपाचे सहकारी सरकारी आरोग्य व्यवस्थेची बदनामी करत आहेत, असा घणाघात नाईक यांनी केला आहे.
वैभव नाईक राणेंवर सडकून टीका केली आहे. नाईक म्हणतात, राणेंनी सहा महिन्यांनंतरही स्वत:चे रुग्णालय कोविडसाठी दिले नव्हते. राणेंच्या नाकर्तेपणाचा फटका त्यांच्या सुदन बांदिवडेकर या कार्यकर्त्याला बसला. राणे आपल्या कार्यकर्त्यांना व कर्मचाऱ्यांनाही आपल्या हॉस्पिटलचा आधार देऊ शकले नाहीत. जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी मोफत रुग्णसेवा दिली व काहींनी आपल्या रुग्णालयात कोविड १९च्या रुग्णांवर उपचार सुरू केले. त्यामुळे नाइलाजाने राणेंना आपल्या रुग्णालयातील काही बेड कोविडसाठी द्यावे लागले, असा आरोप नाईक यांनी केला आहे.
'सुरुवातीपासून त्यांनी आपल्या रुग्णालयात कोविडचे उपचार सुरू केले असते तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना मिळाला असता, असं वैभव नाईक म्हणाले आहेत. 'त्यांच्या रुग्णालयात किती जण उपचार घेत आहेत. किती रुग्ण बरे झाले हे नितेश राणेंनी जाहीर करावे. आरटीपीसीआर लॅब वेळी देखील राणेंनी असेच राजकारण केले. भाजपाच्या आमदारांच्या निधीतून (अर्थात शासनाचे) पैसे घेऊन राणेंनी आपल्या रुग्णालयात कोविड १९ लॅब सुरू केली. शासनाचे पैसे वापरून सुद्धा राणे जिल्हावासीयांना कोविड टेस्ट मोफत देऊ शकलेले नाहीत. त्यातही आर्थिक व्यवहार त्यांनी सुरू ठेवला. त्यांच्या रुग्णालयात किती रुपये दिल्यावर कोविड टेस्ट केली जाते हेही त्यांनी जाहीर करावे,' असे आव्हानच नाईक यांनी दिले आहे.
गेले सात ते आठ महिने नितेश राणे व त्यांचे सहकारी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाची बदनामी करत आहेत. वास्तविक अनेक रुग्ण जिल्हा रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. त्यात माझ्यासह इतर सामान्य नागरिक, व्यापारी व उद्योजक आहेत. नितेश राणेंचे अनेक पदाधिकारी, इंजिनीअरिंग कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा याच रुग्णालयात उपचार घेतले आहेत, असा दावा नाईक यांनी केला आहे. नितेश राणे मुंबईत बसून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी या सर्वांचे मनोधैर्य खच्ची करत आहेत. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर हे जिल्ह्यात वेगवेगळ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत आहेत.
मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार असताना नारायण राणेंनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा न सुधारता स्वत:चे खासगी मेडिकल कॉलेज उभारले. मात्र, कोरोनाच्या महामारीत हे रुग्णालय रुग्ण सेवेपासून अलिप्त ठेवण्यात आले. ही वस्तुस्थिती नितेश राणे स्वीकारणार आहेत का?,' असा प्रश्नही नाईक यांनी केला आहे. नितेश राणे व त्यांचे भाजपाचे सहकारी आपल्या पक्षाच्या गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नेहमी भेटत असतात. गोवा राज्याने सिंधुदुर्गातील रुग्णांवर उपचार करणे बंद केले आहे. या रुग्णसेवेसाठी महाराष्ट्र सरकार गोवा सरकारला उपचाराचे पैसे वेळेवेळी देत होते. त्यामुळे नितेश राणेंनी आरोप करण्यापेक्षा गोवा रुग्णालयात सिंधुदुर्गमधील रुग्णांवर उपचार व्हावे यासाठी पाठपुरावा करावा, असा सल्लाही नाईक यांनी दिला आहे.