मुंबई - उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारार्थ तृतीयपंथी मैदानात उतरले आहे. आज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सुमारे १०० पेक्षा जास्त तृतीयपंथीनी दिंडोशीत त्यांचा प्रचार केला.
महायुतीकडून उमेदवारी जाहीर होताच तृतीयपंथी यांनी वायकर यांची भेट घेत त्यांच्या समवेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसारच द्वारकामाई चॅरिटेबल ट्रस्टचे दि.पवन यादव यांच्या माध्यमातून १०० पेक्षा जास्त तृतीयपंथी, महिला व पुरूष तसेच मुलं आणि मुली असे मिळून सुमारे १००० जणांनी आज दिंडोशी, गोरेगाव (पूर्व) येथील क्रांतीनगर, रामलीला मैदान, पाणबुडी, पिंपरीपाडा ते इंदिरानगर पर्यंत वायकर यांचा घरोघरी जाऊन प्रचार केला.जनतेला मतदान करण्याचे आवाहन करत त्यांनी यावेळी मतदान जागरूकता अभियान रॅली काढली.
तृतीयपंथीयांनी वायकर यांची भेट घेऊन समाजात त्यांना भेडसवणार्या समस्या संदर्भात चर्चा केली होती. यात तृतीयपंथीयांसाठी कुठेच शौचालयाची व्यवस्था नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले होते. तृतीयपंथी यांची होणार ही गैरसोय लक्षात घेऊन तातडीने गोरेगाव (पूर्व) आरे चेक नाका येथे उभारलेल्या उद्यानात तृतीयपंथीसाठी शौचालय उभारल्याची माहिती त्यांनी दिली.