- मनोहर कुंभेजकर, मुंबईदिवाळी हा अंधार दूर करून सकारात्मक वृत्तीने वाटचाल करण्याची दिशा देण्याचा सण. पणत्यांना-दिव्यांना दिवाळीत खूप महत्त्व असते. पणत्या-दिवे तयार करणारे लाखो हात महाराष्ट्रात आहेत. मात्र आपल्या व्यंगावर मात करून वर्सोवा येथे राहणारी कल्पस्वी राणे या विशेष तरुणीने आपल्या घरीच विविध प्रकारच्या आकर्षक सुबक पद्धतीने पणत्या-दिवे तयार केले आहेत. त्यातून अर्थार्जन झाल्यामुळे तिचा आनंद ओसंडून वाहत आहे.टीव्हीचे कार्यक्रम गाणी असली तरी आपल्या कामात एकलव्यासारखी तल्लीन होऊन ती पणत्या रंगवते. तिची ही कामगिरी थक्क करणारी असून ती असामन्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तिच्या पणत्यांना अटकेपार विदेशातदेखील मागणी आहे. यंदाच्या वर्षी डिशवर रंगरंगोटी, मोती, खडे लावून त्यामध्ये पणती सजवून तिने आकर्षक पद्धतीच्या पणत्या तयार केल्या आहेत. या पणत्यांना यंदा खूप मागणी असून आतापर्यंत तिने सुमारे ३० हजारांच्या पणत्या विकल्याची माहिती तिची आई नीना राणे यांनी दिली.कल्पस्वी ही ‘डाउन सिंड्रोम’ या अनुकदोषामुळे निर्माण होणाऱ्या विकाराची रुग्ण आहे. पण आपल्या या रोगावर मात करून लहानपणापासून रंगकामाची, भिंती रंगवण्याचीसुद्धा आवड आहे. तिच्या या रंगवण्याच्या कला आणि जिद्दीला तिच्या आई नीना राणे यांनी प्रोत्साहन दिले. यामध्ये तिला निर्मळ आनंद तर मिळतोच, पण मिळालेल्या पणत्यांच्या मागणीमुळे तिला अर्थार्जनदेखील होते. मात्र पैशापेक्षा पणत्या रंगवण्यातून तिला जो निर्मळ आनंद मिळतो, तिच्या कलेचे कौतुक होते हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असते, अशी प्रतिक्रिया नीना राणे यांनी व्यक्त केली आहे.कल्पस्वीला पहिल्यापासून रंगकाम करायची आवड होती. मात्र ती जास्त हायपर अॅक्टिव्ह असल्यामुळे सुरुवातीला तिचे रंगकाम हे त्रासदायक वाटायचे. तिला या कामी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळावे म्हणून तिला रंगवण्याची पुस्तके, मातीची मडकी, रंगवण्यासाठी तबकडी तिच्या आईने आणून दिली. त्यामुळे तिला रंगकामाची अधिक आवड निर्माण होऊन तिचा रंगकामाचा स्वयंरोजगार सुरू झाला. कल्पस्वीची आई नीना राणे या सेंट्रल बँकेच्या निवृत जनसंपर्क अधिकारी आहेत. त्या कार्यरत असताना आईबरोबर कधीकधी येणारी कल्पस्वी ही सर्वांची लाडकी होती. त्यामुळे तिने केलेल्या पणत्यांना परिचितांकडून मागणी येऊ लागली. ३ वर्षांपूर्वी राज्याच्या माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दादर येथील महाराष्ट्र चेंबर्स अँड कॉमर्सच्या व्यापार पेठ प्रदर्शनाला भेट दिली असता त्यांनी कल्पस्वीला बेस्ट प्रॉडक्ट-बेस्ट स्टॉलचे पारितोषिक दिले होते. त्यावेळी तीच्या चेहऱ्यावरचा आनंद असोडून वाहत होता,त्यावेळी मला स्वर्ग ही ठेंगणा वाटू लागला अशी माहिती त्यांनी दिली.त्यामुळे कल्पस्वी सारखी अनेक गतीमंद आहेत.त्याच्याकडे चिवटपणा-जिद्द असते.जर त्यांच्याकडे त्यांच्या कुटुंबाने आणि समाजाने जातीने लक्ष दिले आणि त्यांच्या कलागुणांना,कल्पकतेला वाव दिला तर अनेक गतीमंदाच्या जीवनातील अंधार दूर होऊन त्यांचे जीवन प्रकाशमय होऊन त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळेल असे मत नीना राणे यांनी शेवटी व्यक्त केले.
वर्सोव्याच्या कल्पस्वी राणेची नवी ‘कल्पकता’
By admin | Published: October 29, 2016 3:56 AM