मुंबई : मध्य वैतरणा धरणाच्या कामाचा वाढीव खर्च आणि व्याजाची रक्कम असे मिळून ३० कोटी रुपये कंत्राटदाराला देण्याची वेळ मुंबई महापालिकेवर आली आहे. वाढीव कामाचा मोबदला म्हणून १५ कोटी आणि व्याज १४.३९ कोटी असे मिळून एकूण ३० कोटी इतकी रक्कम द्यावी लागणार आहे.
पालघर जिल्ह्यातील मोखाड्यामधील कोचळे गावात मध्य वैतरणा धरण बांधण्यात आले आहे. २००८ साली सोमा कन्सॉर्टियम या कंपनीला ६७५ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. २०१२ साली धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. तोपर्यंत कंत्राटात १४० कोटी रुपयांची वाढ झाली. त्यामुळे धरणाचा एकूण खर्च ८१५ कोटी रुपयांच्या घरात गेला. हा खर्च कंत्राटदाराला देण्यात आला.
चालू बिलातून एक टक्क्याप्रमाणे वजा केलेल्या लेबल सेसच्या ८.५ कोटी रुपयांचा परतावा करावा, प्रतिब्रास २०० रुपये वाढीव दराने केलेल्या अतिरिक्त १०० रुपये प्रतिब्रास फरकाप्रमाणे सरकारकडे भरणा केलेल्या ४.६५ कोटी रुपयांचा परतावा करा, तसेच अन्य कामांसाठी झालेल्या अतिरिक्त खर्चाची रक्कम म्हणून ११.७१ कोटी रुपयांचा मोबदला मिळावा, अशी मागणी कंत्राटदाराने केली होती. ही मागणी पालिका प्रशासनाने अमान्य केली होती. त्यामुळे कंत्राटदाराने प्रकरण लवादापुढे नेले.
२०२८ पासून या प्रकरणावर सुनावणी सुरू होती. सुनावणीअंती लवादाने लेबल सेसप्रकरणी ८.५ कोटी द्यावेत, ही कंत्राटदाराची मागणी अमान्य केली.
अन्य दोन मागण्या मान्य केल्या. पालिकेने लवादाच्या निवाड्यानुसार ३० कोटी रुपये कंत्राटदाराला दिले आहेत.
धरणासाठी पावणेदोन लाख झाडांवर कुऱ्हाड :
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सहा धरणातून रोज ३ हजार ५५० दशलक्ष लिटर एवढा पाणी पुरवठा होत होता. मात्र, मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची टंचाई जाणवू लागली. त्यामुळे मध्य वैतरणा धरण प्रकल्प हाती घेण्यात आला. या धरणातून रोज ४५५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. धरणाचे पूर्ण बांधकाम काँक्रीटचे असून, अशा प्रकारचे बांधकाम असलेले ते महाराष्ट्रातील पहिले, तर देशातील दुसरे धरण आहे. या धरणासाठी तब्बल पावणेदोन लाख झाडे तोडावी लागली होती.