Join us

वाजत - गाजत बाप्पाची विसर्जन मिरवणूक, लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 11:22 PM

मुंबापुरीचा उत्साह द्विगुणित करत गणेशोत्सवाने मायानगरीत ह्यप्राणह्ण ओतला. दिवसरात्र श्रीगणेशाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या मुंबईकरांनी श्रींची मनोभावे सेवा केली. टाळ, मृदुंगाच्या गजरात न्हाहून निघालेल्या गणेशोत्सवाने मुंबापुरीच उजळून टाकली. मात्र आज (मंगळवार) श्रीगणेशाला जेव्हा निरोप देण्याची वेळ आली; तेव्हा भक्तांचे डोळे पाणवले.  निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...

- सागर नेवरेकरमुंबई. दि. 5 -  मुंबापुरीचा उत्साह द्विगुणित करत गणेशोत्सवाने मायानगरीत  प्राण  ओतला. दिवसरात्र श्रीगणेशाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या मुंबईकरांनी श्रींची मनोभावे सेवा केली. टाळ, मृदुंगाच्या गजरात न्हाहून निघालेल्या गणेशोत्सवाने मुंबापुरीच उजळून टाकली. मात्र आज (मंगळवार) श्रीगणेशाला जेव्हा निरोप देण्याची वेळ आली; तेव्हा भक्तांचे डोळे पाणवले.  निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...  असे म्हणत भक्तांनी साश्रूनयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाकडे पुढच्या वर्षी भेटण्याची विनंती केली; आणि अशाच काहीशा भक्तीमय रंगात रंगलेल्या मुंबापुरीतल्या गिरगाव, दादर, जुहू आणि वेसावे या प्रमुख समुद्र चौपाटयांसह कृत्रिम व नैसर्गिक तलावांत भक्तांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले.अनंत चतुर्दशीचा सुर्योदय झाला; आणि मुंबापुरीतल्या घरांसह सार्वजनिक मंडळांत बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकांची सुरुवात झाली. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील सर्वच विसर्जन स्थळांवर तैनात सेवा-सुविधांच्या सानिध्यात मिरवणूकांना सुरुवात झाली. सकाळी अकरापासून सुरु झालेल्या विसर्जन मिरवणूकांनी मुंबापुरीचा आसमंत दुमदुमून गेला. हिंदी आणि मराठी गाण्यांच्या तालावर तरुणाई थिरकू लागली. डिजेचा दणदणाट सुरु झाला. टाळ आणि मृदुंगांच्या तालावर भजने रंगू लागली. निळ्याभोर आकाशात बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकांदरम्यान गुलालाची उधळण होऊ लागली. येथे भक्तांशी भक्तीरसाचा झालेल्या संगमाने मुंबापुरीच्या विसर्जन मिरवणूकांत आणखी जान आणली. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या...  अशा जयघोषात जड अंतकरणानी बाप्पाला निरोप दिला जात असतानाच लालबागचा राजा, चिंतामणीचा चिंचपोकळी, मुंबईचा राजा, फोर्टचा राजा, गिरगावचा महाराजा आणि अंधेरीचा राजा; या मिरवणूकांनी जगाचे लक्ष वेधून घेतले. ह्यही शान कोणाची; लालबागच्या राजाची...ह्ण या जयघोषाने तर अवघी मुंबापुरी दुमदुमली. सकाळसह दुपारी सुरु झालेल्या या विसर्जन मिरवणूकांनी मुंबई भक्तीरसात न्हाहून निघाली. सुर्यास्ताची किरणे क्षितिजावर पसरताच विसर्जनातील गर्दी उत्तरोत्तर वाढतच गेली. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी आणि वेसावेसह कुर्ला येथील शीतल तलाव, पवई तलाव, भांडूप येथील शिवाजी तलाव, शीव तलाव अशा प्रमुख विसर्जन स्थळांवरील मिरवणूकांच्या रांगा सायंकाळसह रात्री उत्तरोत्तर लांबतच गेल्या.मुंबई महापालिकेसह पोलीस आणि उर्वरित यंत्रणांनी यावेळी बजावलेली भूमिका भक्तांसाठी मोलाची ठरली. विसर्जनस्थळांवरील सेवा-सुविधांनी नागरिकांना मोठया प्रमाणावर दिलासा दिला. सकाळपासून सुरु झालेल्या मिरवणूका सुर्य अस्ताला गेला तरी सुरुच होत्या; आणि बाप्पाच्या गजराने अवघी मुंबापुरी दुमदुमली होती. रात्रीच्या काळोखातही लख्ख पडलेल्या कृत्रिम प्रकाशाने मुंबापुरीतल्या विसर्जन मिरवणूका उजळून निघाल्या होत्या. कुलाब्याच्या टोकापासून इकडे मुलुंड ते दहिसरपर्यंत हरएक परिसर पुर्ण दिवस बाप्पामय होऊन गेला होता. मुंबापुरीतल्या मिरवणूका पाहण्यासाठी राज्यातील नागरिकही दाखल झाल्याने येथील गर्दीचा उत्साह ओसंडून वाहत होता.थाटामाटात बाप्पा निघाले...मंगळवारी सकाळी नऊ वाजता मुंबईतील लालबागचा राजा, घोडपदेवचा राजा, मुंबईचा राजा, गणेश गल्लीचा राजा, काळाचौकीचा महागणपती, खेतवाडीचा विघ्नहर्ता, चिंचपोककळीचा चिंतामणी, लोअर परळ राजा, रंगारी बदक चाळीचा लंबोदर, गिरणगावचा राजा, गिरगावचा महाराजा, गिरगावचा राजा, मालाडमधील कुरारचा राजा लोकप्रिय गणपती बाप्पाला ढोल ताशाच्या गजारात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरु होती. त्याच बरोबर घरगुती गणपतीसुध्दा थाटामाटात चौपाटीच्या दिशेने वाटचाल करत होती.दिमागात विसर्जन मिरवणूकपहाटे उठून गणरायाची सामुदायिक आरती केल्यानंतर बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यास सुरुवात झाली. यावेळी अबाल-वृद्धांनी ढोलाच्या तालावर ताल धरत बाप्पाला निरोप देण्यात सहभागी झाले आहेत. मंगळवारी गणेश विसर्जनाचा शेवटचा दिवस असल्याने बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईच्या प्रत्येक रस्त्यातून आणि गल्लीबोळातून मिरवणुका निघाल्या होत्या. त्यामुळे मुंबईचे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. सर्वत्र गुलालाची उधळण, ढोलताशाचा खणखणाट आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष असे वातावरण दिसून येत होते. दुपारनंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका चौपाटीवर पोहचल्याने भक्तांनी चौपाट्याही फुलून गेल्या होत्या. यावेळी घरगुती गणपतींचे विसर्जन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. त्यासाठी महापालिकेकडून चौपाट्यावर खास व्यवस्था केली होती. रात्री 11 वाजेपर्यंत शहरातील सर्व चौपाट्यांवर मिळून 2840 सार्वजनिक गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन झाले. तर 24 हजार 070 घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. 

मोठ्या गणपतींना पुष्पवृष्टीचिंचपोकळीचा राजा आणि त्यानंतर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघाली. यावेळी लालबागमध्ये जनसागर उसळला होता. लालाबागच्या राजाला श्रॉफ बिल्डिंगवरुन पुष्पवृष्टी दिली गेली. चिंचपोकळीच्या चिंतामणीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. माटुंगा येथील प्रगती सेवा मंडळाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीतही पुष्पवृष्टी करण्यात आली.चौपाट्यावर भक्तीमय वातावरणगिरगाव चौपाटीवर हजारो भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जमले आहेत. अनेकांनी मोबाईलमध्ये गणरायाची छबी टिपण्यासाठी मोबाईल फोन उंचावले आहेत. सायंकाळी नरेपार्कचा राजा, ग्रँटरोडचा राजा, रंगारी बदक चाळीचा लंबोदर, खेतवाडीचा विघ्नहर्ता आदी गणपती गिरगाव चौपाटीवर दाखल झाले आहेत. सायंकाळी सात वाजता गणेश गल्लीच्या राजाचे विसर्जन संपन्न झाले. रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत राहणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभागमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गणपती विसर्जन मिरवणूकीत वाहतूक कोंडी, विसर्जनासाठी मंडळांना सहकार्य आणि चौपाटीवरील स्वच्छता यात हिरीरीने भाग घेताना दिसत होते. पोलिसांचा चोख बंदोबस्तशहरात गणपती विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेले लाखो भाविकांना वेळोवेळी पोलीसांकडून मार्गदर्शन मिळत होते. तसेच गर्दी कमी करण्यासाठी पोलीस मदत करत होते. परिणामी, चौपाट्यावर भाविकांचा ओघ वाढतच होता.