वज्रेश्वरी, वज्राबाई अन् नाथसंप्रदाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 07:36 AM2020-05-17T07:36:23+5:302020-05-17T07:36:43+5:30

वज्रेश्वरीजवळ तानसा नदीच्या समोरच्या काठावर ‘मंदाकिनी’ नावाचा डोंगर आहे. या डोंगराच्या मागील बाजूला गुंज व काटी नावाच्या गावांत वज्रेश्वरीचे मूळ मंदिर होते. आजही या गावात मध्ययुगातील काही मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात.

Vajreshwari, Vajrabai Annath Sampraday | वज्रेश्वरी, वज्राबाई अन् नाथसंप्रदाय

वज्रेश्वरी, वज्राबाई अन् नाथसंप्रदाय

Next

- डॉ. सूरज अ. पंडित

सोपारा-वसईच्या पश्चिमेला तुंगारेश्वर डोंगराच्या पायथ्याशी ‘वज्रेश्वरी क्षेत्र’ आहे. सध्याचे वज्रेश्वरी देवीचे मंदिर हे पेशवेकालीन (अठराव्या शतकातील) असून मराठा स्थापत्याचे एक उदाहरण आहे. वज्रेश्वरीजवळ तानसा नदीच्या समोरच्या काठावर ‘मंदाकिनी’ नावाचा डोंगर आहे. या डोंगराच्या मागील बाजूला गुंज व काटी नावाच्या गावांत वज्रेश्वरीचे मूळ मंदिर होते. आजही या गावात मध्ययुगातील काही मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात.

मुं बई परिसरातील सोपारा, कल्याण, घारापुरीसारख्या नागरी वसाहती, त्यांच्या सांस्कृतिक-धार्मिक महत्त्वाविषयी तसेच शिलाहार काळात बदलत जाणाऱ्या धर्मपरंपरा आणि त्यांच्याशी संबंधित विधी यांची चर्चा आपण गेल्या काही लेखांमध्ये केली. आता नागरी वसाहत नसलेल्या परंतु धार्मिक अशा ‘वज्रेश्वरी’ (वडवली) परिसराची माहिती घेऊ.
भिवंडी ते वज्रेश्वरी या परिसरात शिलाहारोत्तर काळातील काही जैन मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात. सोपारा-वसई परिसरातही जैनांचे प्रभुत्व वाढीस लागले होते. याचबरोबर, तुंगारेश्वर डोंगरात ‘थोरलं टाकं’ व ‘धाकलं टाकं’ नावाने परिचित असलेली शिलाहारकालीन दोन शिवमंदिरे, मंदिरांचे पुरावशेष ज्ञात आहेत.
शिलाहारोत्तर काळ बौद्ध धर्माच्या उतरणीचा काळ होता. कोकणातील सोपारा, कान्हेरी, महाकाली, महाड, चिपळूण-दापोली परिसरांतील पन्हाळेकाजीसारखी काही केंदे्र वगळता महाराष्ट्राच्या बहुतांश भागांतून बौद्ध धर्म नामशेष झाला होता. उत्तर कोकणात कान्हेरी हे वज्रयान बौद्ध केंद्र म्हणून साधारण पंधराव्या शतकापर्यंत कार्यरत होते आणि त्याचा पगडा उत्तर कोकणावर बºयापैकी होता. येथील बौद्ध धर्माचे स्वरूप पूर्णपणे वेगळे होते.
अकराव्या शतकातील नेपाळमध्ये लिहिल्या गेलेल्या एका ‘प्रज्ञापारिमता सूत्रा’च्या हस्तलिखितात कान्हेरी येथील मुख्य चैत्यगृहाचे ‘वज्रचैत्य’ म्हणून वर्णन व चित्रणही दिसते. येथील बौद्धमतात बौद्धतंत्राचा शिरकाव झालेला होता. या तंत्रात आचार्य-साधकांबरोबर विविध बुद्ध, बोधीसत्त्व, त्यांच्या शक्ती व डाकिणी अशा विविध देवता व त्या संबंधित तंत्राचाराचा प्रचार झाला होता. बौद्धतंत्रात या डाकिण्यांचे विविध प्रकार सांगितले आहेत. त्यापैकी एकात मानवी स्वरूपात जन्म घेऊन ‘योगिनी’ म्हणून ज्ञात असलेल्या काही देवदेवतांचा समावेश झालेला दिसतो.
वज्रयान बौद्ध परंपरेत ‘वज्रडाकिणी’ अथवा ‘वज्रा’ नावाची एक डाकिनी प्रसिद्ध आहे. बौद्धतंत्रातील विविध मंडळांमध्ये ती देवता म्हणून प्रस्थापित झालेली दिसते. कदाचित, हिचा वज्रेश्वरीच्या ‘वज्राबाई’शी काही संबंध असावा. वज्रेश्वरीजवळच्या अकलोली-गणेशपुरी या पाच किलोमीटरच्या परिसरात जवळपास २१ गरम पाण्याची कुंडे असल्याची लोकपरंपरेत धारणा आहे. अर्थात, या भूशास्त्रीय रचनेला मध्ययुगीन काळात धार्मिक महत्त्व प्राप्त होणे, हे साहजिकच होते. डॉक्टर म.न. देशपांडे यांनी केलेल्या निरीक्षणानुसार कोकणातील वज्रयान बौद्ध केंद्रे व गरम पाण्याची कुंडे ही एकाच परिसरात असून यांचा एकमेकांशी विशिष्ट संबंध आहे.
वज्रेश्वरीजवळ काटी नावाच्या गावांत वज्रेश्वरीचे मूळ मंदिर होते. आजही या गावात मध्ययुगातील मंदिरांचे अवशेष पाहायला दिसतात. येथे परशुराम आणि इतर देवतांची मंदिरे व पाण्याची टाकी आहेत. पोर्तुगीजांच्या धार्मिक अत्याचारांमुळे वज्रेश्वरीचे देऊळ हलवण्यात आले, असे इतिहास सांगतो. मंदाकिनी डोंगरामध्ये दोन छोट्या नैसर्गिक गुहा आहेत. थोडे बदल करून मध्ययुगात केव्हा तरी या माणसांनी वापरायला सुरुवात केली. त्यांचा वापर प्रामुख्याने तंत्राचारासाठी, ध्यानधारणेसाठी तत्कालीन धार्मिक परंपरांनी केला असावा. आज याला नाथसिद्धांच्या परंपरेचे वलय प्राप्त झाले आहे.
नवनाथांच्या पोथीत वज्राबाईची एक कथा येते. सांस्कृतिक स्थित्यंतरांचा अभ्यास करताना, या धार्मिक साहित्यातील लोकपरंपरा अतिशय महत्त्वाच्या ठरतात आणि म्हणूनच अशा कथांची चर्चा पुढील लेखांत करणार आहोत.

(लेखक साठ्ये महाविद्यालयात प्राचीन भारतीय संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाचे विभागप्रमुख आहेत.)
 

Web Title: Vajreshwari, Vajrabai Annath Sampraday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई