गुजरातच्या व्यापाऱ्याचे धावत्या ट्रेनमधून अपहरण; मुलाकडे खंडणी मागणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 18:06 IST2025-02-27T18:04:55+5:302025-02-27T18:06:36+5:30
गुजरातमधील वृद्ध व्यापाऱ्याचे अपहरण करुन खंडणी मागणाऱ्या आरोपींना वाकोला पोलिसांनी अटक केली.

गुजरातच्या व्यापाऱ्याचे धावत्या ट्रेनमधून अपहरण; मुलाकडे खंडणी मागणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या
Mumbai Crime: गुजरातमधील वृद्ध व्यावसायिकाचे अपहरण करून सुटकेसाठी खंडणी मागणाऱ्या आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. वाकोला पोलिसांनी अपहरण झालेल्या गुजरातमधील कापड व्यापाऱ्याची सुटका केली. खंडणीसाठी अपहरण केल्यानंतर आरोपींनी व्यापाऱ्याला गोरेगावमधील एका फ्लॅटवर कोंडून ठेवलं होतं. वाकोला पोलिसांनी तपास करत व्यापाऱ्याची सुटका केली आणि तीन आरोपींना ताब्यात घेतलं. आरोपीनी वृद्धाला मारहाण केल्याचेही समोर आलं आहे.
पोलिसांनी ६० वर्षीय व्यावसायिक केशवजी भीमाभाई चौधरी यांची अपहरण झाल्यानंतर २४ तासांतच सुटका केली. पोलिसांनी या प्रकरणात आयुर्वेदिक उत्पादन विक्रेता असलेला राधेश्याम मेवालाल सोनी (३०), विमा एजंट सतीश नंदलाल यादव (३३) आणि सुरक्षा रक्षक असलेल्या धर्मेंद्र रामपती रविदास (४०) याला अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी मुंबईच्या वेगवेगळ्या भागात राहतात. केशवजी यांचा मुलगा महेशकुमार चौधरी यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती.
महेशकुमार चौधरी हे मूळचे गुजरातच्या कच्छ येथील असून त्यांचे आई वडील हे गुजरातला राहतात. तर महेशकुमार चौधरी हे वाकोला येथे राहत असून कपड्याचा व्यवसाय करतात. केशवजी चौधरी हे गुजरात येथून मुंबईत कपडे आणून विक्री करतात. २० फेब्रुवारी रोजी केशवजी चौधरी कच्छ एक्स्प्रेसने मुंबईत येण्यासाठी निघाले होते. मात्र ते घरी पोहोचलेच नाहीत. यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. त्यानंतर चार दिवसांनी महेशकुमार यांना एक फोन आला. फोन करणाऱ्यांनी केशवजी यांचे अपहरण झालं असून ६८ लाख रुपये द्या नाहीतर त्यांची हत्या करुन अशी धमकी दिली. त्यानंतर महेशकुमार यांनी वाकोला पोलिसात धाव घेऊन या सगळ्या प्रकरणाची माहिती दिली.
पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास सुरु केला. तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. त्यानंतर राधेश्याम सोनी यांना कांदिवलीतील लालजीपाडा येथून अटक करण्यात आली. त्यानंतर इतर दोघाना राम मंदिर परिसरातून अटक करण्यात आली. केशवजी चौधरी हे गुजरातमधील बचौ रेल्वे स्थानकावरून मुंबईला जाणाऱ्या कच्छ एक्सप्रेसमध्ये चढले होते. प्रवासामध्येच आरोपींनी चौधरी यांचे अपहरण केले आणि त्यांना मुंबईत आणून कैद करुन ठेवले होते.