प्रियांका चतुर्वेदी, खासदार
प्यारवाली लव्हस्टोरी सर्वांचीच असते. पण, कुणाचं प्रेम हे लग्नाअगोदर सुरू झालेलं असतं. तर कुणाचं प्रेम हे लग्नानंतर सुरू होतं. लग्नाअगोदरच्या प्रेमाला लव्हमॅरेज असं म्हणतात. प्रेमप्रकरणातून न झालेल्या किंवा कुटुंबीयांनी पै पाहुण्यांच्या मर्जीतून जमवलेल्या लग्नाला अरेंज मॅरेज असं म्हणतात. मात्र, दोन्ही लग्नामध्ये प्रेम हा धागा कॉमन राहतो. प्रेम हे राजकारण्यांनाही होऊ शकतं. राजकारण्यांचीही प्यारवाली लव्ह स्टोरी असू शकते. शिवसेना नेत्या आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितलीय त्याची प्यारवाली लव्ह स्टोरी.
१९ वर्षांची असताना माझा साखरपुडा झाला. आम्ही उत्तर प्रदेशमधील असल्याने आमच्याकडे १८ वर्षांची असतानाच मुलीचं लग्न केलं जातं. त्यानंतरही शिक्षण सुरू असतं, पण ग्रॅज्युएट झाल्यावर लग्न करेन, अशी विनंती मी पप्पांना केली होती. ग्रॅज्युएट झाल्यावर माझं लग्न लावून दिलं. लग्न झालं, दोन मुलं झाली. त्यानंतर राजकारणात जायचं ठरवलं तेव्हा माझे पती विक्रमही आश्चर्यचकित झाले. व्यवसाय खूप चांगला सुरू होता, दोन मुलं होती. त्यामुळे कुटुंबाला कसा वेळ देणार, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचा मला १०० टक्के पाठिंबा होता, पण मनात प्रश्नही खूप होते. राजकारणात अनिश्चितता असल्याचं त्यांचं मत होतं. युवक काँग्रेसमधून माझं राजकारण सुरू झालं, तेव्हा मुलं खूप लहान होती. दिल्लीतील जबाबदारी मिळाल्यावर शनिवार-रविवारी त्यांना भेटायचे. त्याबद्दल मनात खंतही होती. माझ्या पतीला इंग्रजी सिनेमे पाहायला आवडतात, तर मला हिंदी. त्यांच्यामुळे इंग्रजी सिनेमे पाहण्याचा योग येतो.