मुंबई - जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन दिन म्हणून साजरा केला जातो. पाश्चिमात्य संस्कृतीचा हा दिन आता भारतातही सेलिब्रेट होतोय. तरुणाई व्हॅलेंटाईन वीक साजरा करुन आजच्या दिवशी प्रेम भावना व्यक्त करताना दिसून येतात. म्हणूनचा आजचा दिवस हा प्रेमाचा असतो. अनेकजण वेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करतात. आपल्या प्रिय व्यक्तीला हा दिवस समर्पित केला जातो. गायिका अमृता फडणवीस यांनीही आजच्या दिवशी आपल्या संगीत, गायनावरील प्रेमाचा उल्लेख केला आहे.
अमृता फडणवीस या गाण्यावर आणि संगितावर प्रेम करतात. त्यामुळेच, त्यांचं एखादं नवीन गाणं येणार असल्यास त्या आनंदाने त्याबद्दलची माहिती सोशल मीडियातून शेअरही करतात. यापूर्वी गणपती उत्सवात त्यांचं नवीन गाणं रिलीज झालं होतं. त्यानंतर, आता व्हॅलेंटाईन दिनी त्यांनी आणखी एक घोषणाच केली आहे. लॉर्ड शिवा म्हणजे महादेवाच्या भक्तीवर आधारित हे गाणं असल्याचं त्यांच्या ट्विट वरुन वाटत आहे. विशेष म्हणजे अमृता फडणवीस यांचा लुकही त्याच पद्धतीचा दिसून येतो. भगव्या वस्त्रामध्ये गळ्यात रुद्राक्षांची माळ घातलेल्या आणि हाती त्रिशूल धरलेल्या अमृता फडणवीस दिसत आहेत.