अमृता फडणवीस, बँकर, गायिका
माणसाच्या जीवनात त्याचा जोडीदार अर्थात व्हॅलेंटाइनचं वेगळं महत्त्व असतं. आपल्याला जोडीदार कसा भेटला... त्याचं जीवनातलं स्थान काय..? घर, संसार उभा करण्यात, चुकलंमाकलं सांभाळून घेणाऱ्या जोडीदाराबद्दल लोकमतच्या ‘फेस टू फेस’ कार्यक्रमात विविध मान्यवरांनी त्यांचा हळवा कप्पा खुला केला होता. त्याच आठवणींचा हा कोलाज ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने बँकर, गायिका आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितलाय. मग, माहिती करुन घेऊयात अमृता देवेंद्र फडणवीस यांची प्यारवाली लव्हस्टोरी.
देवेंद्रजींचं स्थळ आल्यावर ते आई-बाबांना आवडलं. त्यांच्या मनात देवेंद्रजींबाबत एक परसेप्शन होतं की, ते ‘ट्रान्सपरंट पीपल्स मॅन’ म्हणून काम करत आहेत. ते पैशांसाठी काम करत नाहीत. त्यामुळे ते घर कसं चालवतील, असा प्रश्न होता, पण देवेंद्रजींनीच व्ह्यू क्लिअर केला. त्यांनी मला माझा जॅाब सुरूच ठेवायला सांगितला. त्यांचा हा निर्णय ऐकून मला खूप आनंद झाला. कारण, मला करिअर करायचं होतं. मी बँकेत क्लायंट्सना भेटायचे, पण हजारो आणि लाखोंच्या संख्येत लोकांना भेटायची सवय नव्हती. यासाठी मला त्यांनी मदत केली. त्यांचा लोकांसोबतचा व्यवहार पाहून मलाही लोकांविषयी जिव्हाळा निर्माण होऊ लागला. हळूहळू ते जसे आहेत तशी मीदेखील होत असल्याचं जाणवू लागलं. लग्नापूर्वी भेटून आम्ही सर्व गोष्टी डिस्कस केल्या होत्या. कारण मी कोणत्याही दृष्टिकोनातून पॅालिटिकल फॅमिलीला सुटेबल नव्हते. माझ्या ड्रेसिंगपासून विचारांपर्यंत मी वेगळी होते, पण देवेंद्रजींनी म्हटलं की, मला अशीच बायको पाहिजे जी स्वतंत्र असेल आणि माझ्या प्रेमासाठी मला साथ देईल.