जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री
प्यारवाली लव्हस्टोरी सर्वांचीच असते. पण, कुणाचं प्रेम हे लग्नाअगोदर सुरू झालेलं असतं. तर कुणाचं प्रेम हे लग्नानंतर सुरू होतं. लग्नाअगोदरच्या प्रेमाला लव्हमॅरेज असं म्हणतात. प्रेमप्रकरणातून न झालेल्या किंवा कुटुंबीयांनी पै पाहुण्यांच्या मर्जीतून जमवलेल्या लग्नाला अरेंज मॅरेज असं म्हणतात. मात्र, दोन्ही लग्नामध्ये प्रेम हा धागा कॉमन राहतो. प्रेम हे राजकारण्यांनाही होऊ शकतं. राजकारण्यांचीही प्यारवाली लव्ह स्टोरी असू शकते. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं कसं जमलं लग्न, काय आहे प्यारवाली लव्हस्टोरी
दत्ता सामंतांच्या सख्ख्या भावाची मुलगी ऋता सामंत माझी पत्नी. आमची भेट ठरवून झालेली नाही. माझे वडील ज्या कंपनीत कामाला होते तेथे दत्ता सामंतांची युनियन होती. दोघेही एकमेकांसमोरच्या टेबलावर बसायचे. माझे वडील पर्सनल मॅनेजर होते. त्यांच्यासोबत वडिलांचे अतिशय चांगले संबंध होते. दत्ता सामंतांनी ठाण्याची पोटनिवडणूक लढविली. त्यात आमचं घर त्यांच्या नातेवाइकांच्या जेवणाचा अड्डा बनलं होतं. तिथे ऋता आणि माझी पहिली ओळख झाली. तेव्हा ती एअर होस्टेस नव्हती. १९८६मध्ये ती एअर होस्टेस झाली. माझ्या पगारात राजकारण जमत नव्हतं. त्यामुळे माझ्या राजकीय कारकिर्दीत आणि आमचं घर उभं करण्यात तिचं खूप मोठं योगदान आहे. मला दिल्लीला जावं लागायचं तेव्हा ती फ्लाइट ॲडजस्ट करायची. मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष झालो, एनएससीआयचा राष्ट्रीय सरचिटणीस झालो. तेव्हा दौऱ्यांसाठी पैसे नसायचे. त्यावेळी एक मोठी शक्ती माझ्या मागे उभी राहिली ती ऋता होती...