व्हॅलेंटाइन डे : निर्व्यसनी जोडीदार निवडा; तरुणाईला आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:06 AM2021-02-14T04:06:22+5:302021-02-14T04:06:22+5:30
मुंबई : ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त नरिमन पाॅइंट येथे ‘जोडीदार मज निर्व्यसनीच हवा’ या संदेशाची घोड्यावर स्वार लेकींनी वरात काढून व्यसनमुक्तीचा ...
मुंबई : ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त नरिमन पाॅइंट येथे ‘जोडीदार मज निर्व्यसनीच हवा’ या संदेशाची घोड्यावर स्वार लेकींनी वरात काढून व्यसनमुक्तीचा प्रचार केला. मुंबईतील व्यसनमुक्तीपर कार्य करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी, नशाबंदी मंडळाचे पदाधिकारी, संघटक, स्वयंसेवक सहभागी झाले होते.
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यच्या वतीने व्यसनाधिनतेकडे वाढत चाललेली युवकांची वाटचाल थांबविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्या कटआउटद्वारे ‘मित्र-मैत्रिणींनो, जोडीदार निर्व्यसनीच निवडा’ हा संदेश उपस्थितांना भावला. हा संदेश एकाच वेळी देण्याच्या उद्देशाने ‘ प्रेम करा, मात्र जोडीदार निर्व्यसनीच निवडा’ हा संदेश महाराष्ट्रातील लेकी रस्त्यावर उतरून देत असल्याची माहिती मंडळाच्या चिटणीस अमोल मडामे यांनी दिली.
मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी उपस्थित तरुण-तरुणींना व्यसनमुक्तीची शपथ दिली. ज्यात सुमारे १०० मुंबईतील उपस्थित तरुण- तरुणींनी संकल्प केला की मला नको बंगला-गाडी, शोधेन मी व्यसनमुक्त गडी, तर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित चर्चासत्रात उपस्थित ५० तरुणाईला व्यसनमुक्त जोडीदाराचे महत्त्व पटवून दिले गेले आणि प्रा. विष्णू भंडारे यांनी तरुणांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.