व्हॅलेंटाइन डे स्पेशल : जीवनसाथीमुळे मिळाले जीवनदान, पत्नीकडून सर्वात मोठे गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 06:06 AM2023-02-14T06:06:37+5:302023-02-14T06:07:08+5:30
व्हॅलेंटाइन डे स्पेशल : पत्नीने लिव्हर देऊन वाचविले पतीचे प्राण
संतोष आंधळे
मुंबई : आज १४ फेब्रुवारी... जगभरातील प्रेमवीरांसाठी हक्काचा दिन... परस्परांवर भेटवस्तूंचा वर्षाव करत आपल्या प्रेमाचा इजहार करण्याची चढाओढ प्रेमीजनांमध्ये लागली आहे. एकीकडे असे गुलाबी चित्र असताना अग्नीच्या साक्षीने सात फेरे घेतलेल्या आपल्या पतीला लिव्हरचा काही भाग देऊन जीवनदान देण्याची अनोखी दास्तान लिहीत व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची किमया पत्नीने साधली आहे.
कांदिवलीत राहणारे संजय वर्मा (४५) चार वर्षांपासून लिव्हर सोरायसिसने त्रस्त होते. त्यांना सारख्या रक्ताच्या उलट्या व्हायच्या. लिव्हरचे प्रत्यारोपण हाच त्यावर एकमेव उपाय होता. अशा या संकटसमयी संजय यांची पत्नी संगीता पुढे आल्या व त्यांनी पतीला लिव्हर देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये सर्व वैद्यकीय तपासण्या झाल्या. २ फेब्रुवारीला लिव्हर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. संगीता यांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. वर्मा यांना आज, मंगळवारी जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात येणार आहे. बायकोमुळे माझा दुसरा जन्म झाला आहे. तिच्यासाठी मी काहीपण करायला तयार आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया संजय यांनी दिली. तर पती सुखरूप घरी येणार, हेच आमचे व्हॅलेंटाइन सेलिब्रेशन, अशी प्रतिक्रिया संगीता यांनी दिली.
संजय यांचे प्राण वाचविण्यासाठी लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे भाग होते. याकरिता त्यांची पत्नी पुढे आली. सर्व काही जुळून आले आणि शस्त्रक्रिया करण्यात आली. संगीता यांची शस्त्रक्रिया रोबोटच्या साहाय्याने केली आहे. त्यामुळे संगीता यांना आठवड्याभरात घरी
पाठविण्यात आले. संजय यांना आता आम्ही अतिदक्षता विभागातून साध्या वॉर्डमध्ये आणत आहोत.
- डॉ रवी मोहनका, संचालक, लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभाग