व्हॅलेंटाईन डे; प्रियजनांसोबत प्रेमाचा उत्सव साजरा करण्यास तरुणाई सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:07 AM2021-02-14T04:07:26+5:302021-02-14T04:07:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नवीन वर्ष सुरू होताच विशेषत: तरुणाई ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहते तो दिवस म्हणजे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नवीन वर्ष सुरू होताच विशेषत: तरुणाई ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहते तो दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. जगभरात प्रेम दिवस म्हणून साजरा करण्यात येत असणाऱ्या या दिवसाची भारतीयांमध्येदेखील एक विशेष क्रेझ आहे. मुंबईत कॉलेज, ऑफिस तसेच विविध ठिकाणी १४ फेब्रुवारी रोजी दरवर्षी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना अनोख्या भेटवस्तू देत तसेच मनात एकमेकांविषयी असणाऱ्या भावना सांगून आपले प्रेम व्यक्त करतात. यंदा संपूर्ण व्हॅलेंटाईन विकवर कोरोनाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यामुळे रोज डेपासून सुरुवात झालेल्या या व्हॅलेंटाईन विकला दरवर्षीच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला आहे. व्हॅलेंटाईन विक सुरू होताच मुंबईतील कॉलेज, ऑफिस, कॅफे, रेस्टॉरंट आणि पबमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच अनेक ठिकाणी प्रेमी जोडप्यांसाठी डिस्काउंट ऑफर्स तसेच फ्री एंट्री ठेवत आकर्षक इव्हेंट आयोजित केले जातात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीस कारणीभूत ठरतील अशा सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील तरुणाई यंदाचा व्हॅलेंटाईन डे आपल्या प्रियजनांसोबत साजरा करत आहे.
शनिवारी मुंबईतील अनेक ठिकाणी गिफ्टच्या दुकानांमध्ये तरुणाई आपल्या जोडीदारासाठी गिफ्ट खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती.
यावेळी गिफ्टच्या दुकानामध्ये विविध ऑफर्स ठेवण्यात आल्या होत्या. आपल्या जोडीदारासाठी छान संदेश असणारे कार्ड, कॉफी मग, टेडी बेअर, घड्याळ, वॉल पेंटिंग, रिंग अशा विविध वस्तू गिफ्टच्या दुकानांमधून खरेदी करण्यात येत होत्या. तर काही तरुण व्हॅलेंटाईन डे आपल्या घरातील व्यक्तींसोबत साजरा करणार असल्याने घरातल्यांसाठी मिठाई, चॉकलेट व गुलाबाची फुले खरेदी करत होते. कोरोनामुळे यंदा रेस्टॉरंट मालकांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचले. मात्र आता पूर्णक्षमतेने रेस्टॉरंट सुरू करण्यात आली आहेत. व्हॅलेंटाईन डेचे निमित्त साधून मुंबईतील अनेक रेस्टॉरंटमध्ये प्रेमी जोडप्यांसाठी विशेष ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत. व्हॅलेंटाईन स्पेशल डिनर, एकावर एक फ्री, तसेच काही प्रमाणात डिस्काउंट अशा ऑफर ठेवण्यात आल्यामुळे रविवारी अनेक प्रेमी जोडपी व्हॅलेंटाईन डिनरसाठी आणि ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जाणार आहेत. व्हॅलेंटाईन डेवर कोरोनाचे सावट असले तरीदेखील तरुणाई हा दिवस आपल्या प्रियजनांसोबत मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे.