प्रशासकीय बदलांमध्ये राखला ज्येष्ठ, कार्यक्षम अधिकाऱ्यांचा मान
By यदू जोशी | Published: May 13, 2019 05:05 AM2019-05-13T05:05:58+5:302019-05-13T05:10:02+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील मोजके पण मोठे प्रशासकीय बदल करताना ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा योग्य सन्मान राखून प्रशासनामध्ये एक चांगला संदेश दिला. प्रशासकीय वर्तुळामध्ये त्याचे स्वागत होत आहे.
- यदु जोशी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील मोजके पण मोठे प्रशासकीय बदल करताना ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा योग्य सन्मान राखून प्रशासनामध्ये एक चांगला संदेश दिला. प्रशासकीय वर्तुळामध्ये त्याचे स्वागत होत आहे.
मुख्य सचिव असलेले यूपीएस मदान यांच्या जागी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना मुख्यमंत्र्यांनी संधी दिली. मदान यांची कारकीर्द अत्यंत पारदर्शक आणि कार्यक्षम अधिकारी अशी राहिली आहे. अल्पसंख्याक समाजाचे असलेले मदान यांना महाराष्ट्र दिनी म्हणजे एक मे रोजी राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून झेंडावंदनाचा मान द्यायचा, अशी भावना मुख्यमंत्र्यांच्या मनात होती आणि त्यानुसार त्यांनी मदान यांना मुख्य सचिवपदी नेमले.
त्याच वेळी आपल्या दीर्घ प्रशासकीय सेवेमध्ये एक अत्यंत कार्यक्षम सनदी अधिकारी म्हणून छाप उमटवणारे अजोय मेहता यांना निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना मुख्य सचिवपद देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचा यथोचित गौरव केला.
मुंबई महापालिकेचे आयुक्त झालेले मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांची प्रशासनात स्वत:ला झोकून देणारा कार्यक्षम अधिकारी अशी ओळख आहे. देशातील १४ राज्यांपेक्षा मोठे बजेट मुंबई महापालिकेचे आहे.
मेहता यांना मुख्य सचिव करताना मदान यांचादेखील योग्य सन्मान राखला जाईल, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यांनी मदान यांना स्वत:चे विशेष सल्लागार म्हणून नेमलेच शिवाय सिकॉमचे अध्यक्षपदही त्यांना दिले. लवकरच मदान यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नेमणूक केली जाणार आहे. मदान यांच्या प्रशासनातील गाढ्या अनुभवाचा फायदा आणखी पाच वर्षे यानिमित्ताने राज्याला व्हावा हा मुख्यमंत्र्यांचा उद्देश आहे.
सध्या सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या मेधा गाडगीळ यांची सेवाजेष्ठता डावलण्यात आली आणि त्यांना मुख्य सचिवपदाची संधी दिली गेली नाही, अशी खंत काही ठिकाणी व्यक्त झाली. चार महिन्यांत त्या सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना मानाचे पद देऊन मुख्यमंत्री त्यांचाही मान राखणार आहेत. त्यांना राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी नेमण्यात येईल, असे अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी ‘ती’ अडचण केली दूर
ज्येष्ठतेच्या सबबीखाली अजोय मेहता यांच्यासारखा अधिकारी मुख्य सचिव होऊ शकला नाही, ही खंत प्रशासकीय वर्तुळात राहिली असती. मुख्यमंत्र्यांनी अडचण दूर केली. राज्य वीज मंडळातील मेहता यांची कारकीर्द वाखाणण्यासारखी होती व मुंबई महापालिकेचे सर्वाधिक काळ आयुक्त म्हणून त्यांनी अतिशय चांगले कार्य केले.