Join us

वंचित बहुजन आघाडी हल्ला प्रकरण : ‘त्या’ हल्ल्यामागे पनवेल कनेक्शन ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 8:46 AM

त्यांनी पनवेलचे माजी उपमहापाैर जगदीश गायकवाड यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. 

मुंबई : बैठकीला उशीर होणार असल्याने चहा पिण्यासाठी थांबले असताना दादरमध्ये मागून आलेल्या चार हल्लेखोरांनी वंचित बहुजन युवक आघाडीच्या मुंबई अध्यक्ष परमेश्वर अशोक रणशूरसहित वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर केलेल्या हल्ल्यात दोघेही जखमी असून त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. सोबतच त्यांनी पनवेलचे माजी उपमहापाैर जगदीश गायकवाड यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. 

वंचित बहुजन आघाडी पक्षाचे १६० प्रभागचे अध्यक्ष  गायक गाैतम हराळ (३७) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वंचित बहुजन आघाडी पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अब्दुल खान यांनी ३ जूनला कुर्ल्यात होणाऱ्या सभेची तयारी करण्यासाठी दादर पूर्वेकडील आंबेडकर भवन येथे शनिवारी सायंकाळी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला सुमारे एक हजार सभासदांना बोलाविण्यात आले होते. 

बैठकीला उशीर होणार असल्याने हराळ हे परमेश्वर रणशूर, विश्वास सरदार, विनोद जयस्वाल आणि परवेझ खान असे पाचजण चहा पिण्यासाठी येथील एका चहाच्या टपरीवर गेले होते. पाचही जण दादर पुलाच्या दिशेने चहा घेत असताना माटुंग्याच्या बाजूने चार अनोळखी मारेकरी तेथे आले. काही कळण्याच्या आतच यातील एकाने त्याच्या हातातील पिशवीतून स्टीलचा रॉड बाहेर काढला. त्याने परमेश्वर रणशुर यांच्या डोक्यावर दोन तीनवेळा प्रहार केला. दुसऱ्याने त्याच्या हातातील चाकूने रणशूरच्या पाठीवर वार केले. 

नवी मुंबईच्या माजी उपमहापौरांवर संशयचेंबूरच्या लालडोंगर येथे दोन महिन्यांपूर्वी पनवेलचे माजी उपमहापाैर जगदीश गायकवाड यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द बोलले होते. त्यावरून वाद होऊन परमेश्वर रणशूर यांनी गायकवाडला पकडून चुनाभट्टी पोलिस ठाण्यात नेले. याच रागात, गायकवाड याने कट रचल्याचा संशय त्यांनी पोलिसांकडे वर्तवला आहे. या दिशेनेही पोलिस अधिक तपास करत आहे.

टॅग्स :गुन्हेगारी