मुंबई- भाजपाला थोपवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात असताना दिल्लीत ३१ मार्च रोजी झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आला.
देशातील सध्याच्या कठीण राजकीय परिस्थितीत शरद पवार यांनीच काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व करावे, असा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. या बैठकीला स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. सर्वानुमते शरद पवारांनी नेतृत्व करावं यासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
काँग्रेस नेतृत्व करु शकत नाही, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे म्हणणे आहे. शरद पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाला रोखले जाऊ शकते, असे या ठरावात म्हटले आहे. या ठरावानंतर आता काँग्रेस आणि युपीएतील घटक पक्ष काय भूमिका घेतात देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'यूपीए'च्या अध्यक्षपदावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. यूपीएचं नेतृत्व बदलायचं असेल तर ममता बॅनर्जींशिवाय दुसरी कोणतीही योग्य व्यक्ती दिसत नाही असं, प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. तसेच ममता बॅनर्जींशिवाय यूपीएला इतर विश्वासार्ह पर्याय नाही, असंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
ममता बॅनर्जींनीही लिहिलं पत्र-
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाजपा विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. यात भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून लोकशाहीच्या तत्वांची हत्या केली जात असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी पत्रात केला आहे. त्यामुळे आता भाजपा विरोधी पक्षांनी आता एकत्र येण्याची वेळ आली असून भाजप विरोधात एकत्र यायला हवं, असं आवाहन बॅनर्जी यांनी केलं आहे. तसंच भाजपा विरोधी पक्षांची एक सर्वसमावेशक बैठक आयोजित केली जावी असंही बॅनर्जी यांनी पत्रात म्हटलं आहे.