मुंबई - VBA in Mahavikas Aghadi Meeting ( Marathi News ) गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. आजच्या बैठकीला मविआ नेत्यांकडून वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण पाठवलं होते. मुंबईच्या हॉटेल ट्रायडेंटमध्ये मविआ नेत्यांची ही बैठक होती. मात्र या बैठकीला गेलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधीला १ तास बैठकीबाहेर ताटकळत बसावं लागले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी नाराज झाल्याची बातमी समोर आली आहे.
मविआच्या आजच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर गेले होते. मात्र त्यावेळी डॉ. पुंडकर यांनी बैठकीत आपला अजेंडा महाविकास आघाडीसमोर सादर केला. तेव्हा आम्ही चर्चा करून सांगतो असं म्हणून पुंडकरांना १ तास बैठकी बाहेर बसवून ठेवण्यात आले आणि आतमध्ये मविआच्या तीन प्रमुख पक्षांची बैठक सुरू होती. बैठकीत मिळालेल्या वागणुकीमुळे पुंडकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. डॉ. पुंडकर म्हणाले की, जेव्हा तुम्ही कुणाला निमंत्रण देता तेव्हा त्यांना अपमानित करू नका. जागावाटपाबाबत अद्याप मविआचे काहीही ठरलेले नाही. तुमचा जागावाटपाचा काही फॉर्म्युला ठरला असेल तर सांगा, परंतु त्यांचे आपसात काही ठरलेले नाही. एकमेकांशी ताळमेळ नाही. त्यामुळे आम्हाला काही त्यांनी सांगितले नाही. सुरुवातीच्या बैठकीला आम्ही तिथे बसलो, त्याठिकाणी आम्ही काही मुद्दे उचलले. आम्ही महाविकास आघाडीचा घटक आहोत की नाही याबाबत आम्हाला पत्र द्या. त्यावर आम्ही विचार करतो असं सांगितले. त्यानंतर गेल्या एक दीड तासापासून आम्ही बाहेर बसलो. ही वागणूक योग्य नाही. ही अपमानास्पद वागणूक आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच सुरुवातीच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत, मराठा आरक्षणावर स्पष्ट भूमिका घ्या, संदिग्ध राहू नका. मराठा-ओबीसी आरक्षण, शेतकरी हमीभाव यासारखे इतर मुद्दे दिले आहेत असे अजेंडा आम्ही मांडला. सुरुवातीला दीड तास बैठक झाली, त्यात आम्ही मुद्दे उपस्थित केले. आम्हाला मविआचा घटक पक्ष असलेले पत्र द्या असं म्हटलं, त्यानंतर यावर आम्ही विचार करू, त्यानंतर बाहेर बसायला सांगितले. जवळपास एक दीड तास बाहेर बसवलं. ही अपमानास्पद वागणूक असल्यानेच आम्ही जाहीर नाराजी व्यक्त करतोय. आम्ही निर्णय घ्यायला सक्षम आहोत. पक्षाच्या स्वाभिमानासाठी कधीही तडजोड करणारे नाही. वर्षानुवर्षे रस्त्यावर भांडणारी लोक आहोत. चर्चेची दारे बंद नाहीत, परंतु मविआ नेत्यांची वागणूक योग्य नव्हती. आम्ही याबाबत पक्षाच्या पुढच्या बैठकीत चर्चा करू असं डॉ. पुंडकर यांनी म्हटलं.
दरम्यान, मविआने जागावाटपाचा ठरलेला फॉर्म्युला सांगावा, नसेल ठरला तर ते सांगावे, आणि ठरणार नसेल तर आम्ही दिलेला १२-१२ चा फॉर्म्युला मान्य करावा. महाविकास आघाडीकडे काहीच फॉर्म्युला नाही. त्यांच्या आपापसात भांडणे सुरू आहे. महाविकास आघाडी वेळकाढूपणा का करतेय माहिती नाही. सहा महिन्याने आम्हाला बैठकीला बोलावले आणि बोलवल्यानंतर बाहेर बसवलं. आम्हाला बैठकीचे निमंत्रण दिले होते, आम्ही बैठक आयोजित केली नव्हती. आम्ही घटक पक्ष आहोत की नाही यावर स्पष्ट सांगितले जात नाही असा आरोप डॉ. पुंडकर यांनी सांगितले.