Join us

बारामती अन् मुंबईतील उमेदवारीवरुन वंचित नाराज; महाविकास आघाडीला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 8:32 AM

महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला स्थान देण्यात येणार असल्याचे बोलले जात असून आम्हाला विचारत न घेता जागावाटप होत असल्याचे वंचितने म्हटले आहे. 

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटप झालेले नाही. मात्र, जागावाटप होण्यापूर्वीच शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या दोन पक्षांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला स्थान देण्यात येणार असल्याचे बोलले जात असून आम्हाला विचारत न घेता जागावाटप होत असल्याचे वंचितने म्हटले आहे. 

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उपनेते आणि युवा सेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. त्यापूर्वी, धाराशिव लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेत, तेथेही खासदार ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. दुसरीकडे, शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंची उमदेवारी घोषित केली असून त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली. दरम्यान, महाविकास आघाडीचं अद्याप जागावाटप झालं नाही, तरीही उमेदवारी घोषित होत असल्याने वंचितने स्पष्टी नाराजी व्यक्त केली असून महाविकास आघाडीला सल्लाही दिला आहे. 

महाविकास आघाडीमध्ये लफडा आहे, हे खरे नाही का? लफडा असूनही, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीविषयी सकारात्मक आहे.प्रत्येक पक्ष ज्या पद्धतीने आपापले उमेदवार जाहीर करत आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? काल सुप्रिया सुळे यांना बारामतीतून आणि शिवसेनेने (उद्धव ठाकरे) उत्तर-पश्चिम मुंबईमधून अमोल किर्तीकर यांना उमेदवार म्हणून घोषित केले. अशा पद्धतीने आघाड्या चालतात का? मविआतील पक्ष आघाडी म्हणून नाही तर एकटेच निर्णय का घेत आहेत? तुम्ही आम्हाला सर्व अंतर्गत चर्चा आणि बैठकांपासून दूर ठेवत आहात. पण, निदान चर्चा करून आणि आघाडी म्हणून उमेदवार जाहीर करा, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीने आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, अनेक सवाल उपस्थित केले आहेत. तर, आम्हाला आशा आहे की, वरील मुद्द्यांवर सर्वजण एकत्र बसून समाधान निघेल. आम्ही पुन्हा अधोरेखित करत आहोत की, आम्ही महाविकास आघाडीबद्दल सकारात्मक आहोत, असेही वंचितकडून अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन स्पष्ट करण्यात आलं आहे. 

काँग्रेसमध्येही नाराजी

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम चालू आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अजून सुरू असतानाच ठाकरे यांनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. उत्तर पश्चिम मुंबईतील उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस नेते संजय निरुपम हेही नाराज झाले असून ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

कमिशनचा हिस्सा मिळाला म्हणून उमेदवारी : निरुपम

ठाकरे यांनी शनिवारी अंधेरी येथील एका कार्यक्रमात उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे संतापलेल्या संजय निरुपम यांनी कोरोना काळातील गरिबांच्या खिचडी वाटप घोटाळ्यातील आरोपीची उमेदवारी जाहीर करण्याची घाई का? असा सवाल एक्स या समाज माध्यमातून केला. तर पत्रकार परिषद घेत कमिशनचा हिस्सा पोहोचल्यानेच कीर्तिकरांना उमेदवारी दिली असा आरोप निरुपम यांनी ठाकरे गटावर केला आहे.

टॅग्स :प्रकाश आंबेडकरबारामतीसुप्रिया सुळेउद्धव ठाकरेशिवसेना