मुंबई- कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो - ३ च्या कारशेडच्या कामाला आरेमध्ये सुरुवात करता यावी म्हणून राज्य सरकारने आरेमधील कामावरील बंदी उठविली असतानाच दुसरीकडे अनेक संघटनांकडून या प्रकल्पाला विरोध होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आरेमधील मेट्रो कारशेडला विरोध केला आहे. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर देखील आक्रमक झाले आहेत.
वंचित बहुजन आघाडी, मुंबई प्रदेशच्यावतीने गोरेगावमध्ये मेट्रो कारशेड बांधण्याचा घाट जो शासनाने घातला आहे. त्याच्याविरोधात आगामी रविवारी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
आरे वसाहतीतील वृक्ष तोडण्याविरोधात पर्यावरणप्रेमींनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या वृक्षतोडीविरोधात आज निर्देश दिले आहेत. आरे कारशेडच्या कामासाठी पुढील सुनावणीपर्यंत आरेतील एकही झाड कापू नये असे निर्देश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला दिले. पुढील सुनावणी १० ऑगस्टला होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती उदय लळित, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती एस रविंद्र भट्ट यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मुंबई मेट्रो कॉर्पोरशनच्यावतीने बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, आरेमध्ये कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करण्यात आली नाही. नोव्हेंबर 2019 मध्ये 'जैसे थे'चे आदेश दिल्यानंतर एकही झाड तोडले नसल्याचे कोर्टाला सांगितले. मात्र, या दरम्यान काळात काही झुडपे, तण वाढली होती. ती काढण्यात आली आहे. त्याशिवाय, काही झाडांच्या फांद्या कापण्यात आल्या आहेत. मात्र, कोणतीही वृक्षतोड झाली नसल्याचा दावा मुंबई मेट्रोकडून करण्यात आला.