मुंबई : बहुचर्चित वंचित बहुजन आघाडीने आपल्या दुसऱ्या यादीत मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी रविवारी उमेदवार जाहीर केला आहे. मात्र, इतर पाच मतदारसंघांतील उमेदवार त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वंचित बहुजन आघाडीची मुंबईत २ लाख ३४ हजार ७६२ मते आहेत. त्यामुळे मुंबईत लोकसभेच्या सहा जागा ताकदीने लढविण्याची जोरदार तयारी ‘वंचित’मध्ये सुरू आहे.
मागील २०१९च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मुंबईतील सहा जागांवर आपले उमेदवार उभे करून काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजपला आव्हान उभे केले होते. ‘वंचित’च्या उमेदवारांनी मतांची आघाडी घेत तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली होती. त्याचा मोठा फटका बहुजन समाज पक्ष, आम आदमी पक्ष, रिपब्लिकन आघाडी, समाजवादी पक्ष या पक्षांना बसला होता.
त्याचबरोबर दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई अशा दलित-मुस्लिम बहुल मतदारसंघात प्रस्थापित मतांचे विभाजन करून मोठ्या पक्षांना ‘वंचित’ने घाम फोडला होता. ‘वंचित’च्या मतांची आकडेवारीसुद्धा वाढली होती. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष ‘वंचित’कडे केंद्रित झाले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वंचित काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणूक २०१९ मधील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची मते-
मतदारसंघ उमेदवार २०१९ची मते मुंबई उत्तर सुनील थोरात १५, ६९१ मुंबई उत्तर पश्चिम सुरेश शेट्टी २३, ३६७ मुंबई उत्तर पूर्व निहारिखा खोंडालय ६८,२३९ मुंबई उत्तर मध्य अब्दुल अंजारिया ३३, ७०३ मुंबई दक्षिण अनिल चौधरी ३०, ३४८मुंबई दक्षिण मध्य संजय भोसले ६३, ४१२
१) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी रविवारी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघासाठी वंचितचे मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. या मतदारसंघात भाजपकडून पूनम महाजन यांची उमेदवारी अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.
२) काँग्रेसकडूनही उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यात खान यांची उमेदवारी जाहीर करून ‘वंचित’ने भाजपसह काँग्रेसला आव्हान उभे केले आहे.
३) मुंबईतील इतर पाच मतदारसंघांतील उमेदवार ‘वंचित’ने गुलदस्त्यात ठेवले आहेत. या पाच मतदारसंघांत वंचित टप्प्याटप्प्याने आपले उमेदवार जाहीर केले जातील, असे ‘वंचित’चे उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले.