Join us

Video: घाटकोपरमध्ये गुजराती नावाच्या फलकाची तोडफोड; भाजपा नेत्यांनी केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 1:06 PM

आज भाजपा नेत्यांनी घटनास्थळी येऊन शिवसेना आणि मनसेच्या या कृत्याचा निषेध केला आणि हे फलक पुन्हा लावण्याची मागणी केली.

मुंबई: मुलुंड पाठोपाठ आता घाटकोपरमध्ये देखील मराठी गुजराती वाद पेटला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपरमधील एका उद्यानाचा मारु घाटकोपर हा गुजराती बोर्ड तोडल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून घाटकोपरच्या विविध ठिकाणी असलेले गुजराती बोर्ड तोडण्यास सुरुवात केली आहे. काल रात्री घाटकोपर पूर्वेकडील आर. बी. मेहता मार्गावरील एका चौकाला देण्यात आलेलं गुजराती नावाच्या फलकाची तोडफोड करण्यात आली. ही मोडतोड मनसेने केल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे आता घाटकोपरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. 

आज भाजपा नेत्यांनी घटनास्थळी येऊन या कृत्याचा निषेध केला आणि हे फलक पुन्हा लावण्याची मागणी केली. तर गुजराती लोकांना सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे. आर बी मेहता हे कोण होते यांना माहित आहे का? शंभर वर्षांपूर्वीचा इतिहास तोडण्याचा अधिकार कोणाला आहे? चुकीचं वातावरण तुम्ही मुंबईत पसरवत आहात. शिवसेना आणि मनसे हे एकमेकांमध्ये स्पर्धा करण्याच्या नादात गुजराती लोकांना टार्गेट करत आहेत, हे चुकीचं आहे. मुंबईमध्ये सर्व भाषिक लोक राहतात. कुठेतरी चूक करणार आणि वातावरण खराब करण्याचा प्रकार सुरू आहे, असे मत भाजपाचे नेते प्रवीण छेडा यांनी व्यक्त केले आहे. तर  भाजपाचे स्थानिक आमदार पराग शाह यावर म्हणाले की, शिवसेनेचा अजेंडा आता समोर येत आहे. त्यांच्या या प्रवृत्तीला आम्ही सहन करणार नाही. आम्ही लायब्ररी चालवतो, मेडिकल सेंटर चालवतो, लायब्ररी सह इतर आस्थापना चालवतो, आम्ही भारतीय आहोत. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे, असं पराग शाह यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :भाजपामनसेशिवसेनामराठीमुंबई