Join us

‘राजगृहा’वरील तोडफोड; एक संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 6:05 AM

या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी भीमराव यशवंतराव आंबेडकर (६०) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाच्या आवारात झालेल्या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून बुधवारी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांना या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून राजगृहावर कायमस्वरूपी २४ तास सुरक्षा पुरविण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. तर राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी भीमराव यशवंतराव आंबेडकर (६०) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. भीमराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास एका अनोळखी तरुणाने राजगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. ८ ते १० कुंड्यांचे नुकसान करत, घरांच्या खिडक्यांवर दगडफेक करून तो पसार झाला. संबंधित तरुणाला त्यांनी यापूर्वीही पाहिले असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवाय घटनेच्या आदल्या दिवशी हा तरुण राजगृहासमोरील पदपथावर भटकत असल्याने भीमराव यांनी त्याला हटकले होते. येथे काय करतोस, अशी विचारणा करताच तो रागाने तेथून निघून गेला होता. त्याच रागात त्याने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी दिली.दरम्यान, वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, अ‍ॅड.आनंदराज आंबेडकर आदींनी या घटेनचा तीव्र शब्दांत निषेध केला असून या घटनेच्या पाठीमागे कोणत्या शक्तीचा हात आहे, याचा सरकारने शोध घ्यावा अशी मागणी केली आहे. तसेच पोलीस या घटनेचा तपास करत असून आंबेडकरी जनतेने संयम बाळगावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकरमुंबई