मुंबई, पुणे, नाशिक, बडोद्यात धावणार ‘वंदे भारत’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 04:24 AM2019-06-06T04:24:35+5:302019-06-06T06:35:00+5:30

लोकलची चाचणी पुढील आठवड्यात : मुंबई ते पुणे, मुंबई ते नाशिक दोन तासांत पार करण्याचे लक्ष्य

'Vande Bharat' to be run in Mumbai, Pune, Nashik and Baroda | मुंबई, पुणे, नाशिक, बडोद्यात धावणार ‘वंदे भारत’

मुंबई, पुणे, नाशिक, बडोद्यात धावणार ‘वंदे भारत’

Next

मुंबई : ‘वंदे भारत’ आता महत्त्वांच्या शहरांना जोडणार आहे. मुंबई ते बडोदा, मुंबई ते पुणे आणि मुंबई ते नाशिक या मार्गावर सेमी स्पीडची ‘वंदे भारत’ लोकलची चाचणी पुढील आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे रेल्वे बोर्डाचे रोलिंग स्टॉकचे सदस्य राजेश अग्रवाल यांनी सांगितले.

कुर्ला येथील मध्य रेल्वेच्या कारशेडमध्ये बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी अग्रवाल यांनी सांगितले की, सेमी स्पीडच्या ‘वंदे भारत’ लोकलची चाचणी ही पुढील आठवड्यात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर घेण्यात येईल. या दोन्ही मार्गावर एक एसी आणि एक मेमू वंदे भारत लोकलची चाचणी घेण्यात येईल. मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक या दरम्यान चाचणी घेत असताना ती यशस्वी झाल्यास, या शहरांत पोहोचण्यासाठी दोन तासांपेक्षा कमी वेळ लागेल. या संदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नसून, आमच्या वतीने केवळ शक्यता वर्तविली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या याच मार्गावर एक्स्प्रेसने गेल्यास अडीच ते तीन तास लागतात.
लोकलचा वेग १६० किमीपर्यंत चालविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती आणि देखभाल करण्यावर भर दिला जात आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) यांच्यामार्फत सीबीटीसी सिग्नल यंत्रणेवर काम सुरू आहे. त्यामुळे दोन लोकल आणि मेल, एक्स्प्रेसमधील अंतर कमी करण्यासाठी या यंत्रणेचा वापर होईल. लोकलमध्ये किंवा लोकल मार्गात तांत्रिक बिघाड झाल्यास, स्थानकावरील प्रवाशांसह लोकलमधील प्रवाशांना यांची माहिती दिली जाईल.

दोन शहरांमधील प्रवास कमी अंतरात आणि कमी वेळेत होण्यासाठी, पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी मुंबई ते बडोदा, पुणे, नाशिक मार्गावर वंदे भारत मेमूची चाचणी घेण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी मेमू एसी आणि नॉन एसी अशा दोन्ही प्रकारच्या गाड्या असतील. मागील ५ वर्षांत रेल्वेमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. त्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानक स्वच्छ असल्याचा दावा अग्रवाल यांनी केला. दोन शहरांमधील अंतर कमी वेळेत पार करण्यासाठी मेमू लोकल उपयुक्त आहे. त्यामुळे रेल्वेचे जाळे सर्वत्र पसरून रेल्वेचा विकास होईल, असे अग्रवाल म्हणाले.

रेल्वे मंत्रालयाने मागील वर्षी ६ हजार रेल्वे डब्यांचे उत्पादन केले आहे. या वर्षी ८ हजार रेल्वे डब्यांचे ध्येय असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. पश्चिम रेल्वे मार्गावरील महालक्ष्मी वर्कशॉपमध्ये अत्याधुनिक यंत्रणा आणून त्यांचा विकास केला जाणार आहे. विरार स्थानकात मोटरमनसाठी रेल्वेमध्ये पहिल्यांदाच सिम्युलेटर लावण्यात आले आहे.

‘...तरीही लोकल सेवा ठप्प होणार नाही’
यंदाच्या मान्सूनमध्ये दिवसभर २०० मिमी पाऊस पडला, तरी लोकल सेवा ठप्प होणार नाही, असा विश्वास अग्रवाल यांनी व्यक्त केला. लोकलमध्ये मोबाइल चोरी आणि इतर गुन्हेगारी वाढली असल्याने, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम वेगात सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मध्य, पश्चिम मार्गावर मार्च २०२० पर्यंत प्रत्येकी सहा एसी लोकल
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मार्च २०२० पर्यंत प्रत्येकी ६ एसी लोकल दाखल होतील. पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलचे वाढविण्यात आलेले दर योग्य आहेत. कारण टॅक्सी, बस यांच्या तुलनेत हे दर कमीच आहे. मागील १० वर्षांत लोकलच्या तिकीट दरात वाढ झाली नसल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.

Web Title: 'Vande Bharat' to be run in Mumbai, Pune, Nashik and Baroda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे