मुंबई : मुंबई-अहमदाबाद वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस गुरांना धडकण्याचे सत्र कायम आहे. शनिवारी गुजरातमधील अतुल या स्थानकाजवळ काही बैल या गाडीच्या मार्गावर आले. त्यातील एकाला धडक दिल्याने वंदे भारत एक्स्प्रेसचा पुढील भाग तुटला. महिनाभरात तिसऱ्यांदा असा प्रकार घडला आहे.
अहमदाबादून निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी सव्वाआठच्या सुमारास अतुल स्थानक नजीक आली असता काही बैल रेल्वेमार्ग ओलांडत होते. त्यातील एकाला रेल्वेची जोरदार धडक बसली. या अपघातामध्ये एक्स्प्रेसचा पुढील भाग तुटला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावरून तुटलेला भाग काढून गाडीत ठेवला. त्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस पुढे मार्गस्थ झाली. मात्र, अर्धा तास झालेल्या खोळंब्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
याआधीच्या घटना...
६ ऑक्टोबर- वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईहून अहमदाबादला येत होती. यादरम्यान वटवा ते मणीनगर स्थानकाजवळ म्हशींचा कळप रेल्वे मार्गावर आला. वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसची आणि म्हशींची जोरदार धडक झाली. ८ ऑक्टोबर- वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन गांधीनगरहून मुंबईला येत होती. दुपारी पावणेचारच्या सुमारास कंझरी ते आणंद दरम्यान एक गायीने गाडीला धडक दिली. त्यातही गाडीचा पुढील भाग तुटला होता.