एकदम सुसाट... कोकणातील ‘वंदे भारत’ आता १६ डब्यांची!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 09:34 AM2023-07-16T09:34:53+5:302023-07-16T09:35:09+5:30
मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचे २७ जून रोजी उद्घाटन झाले. गेल्या तीन आठवड्यांत या गाडीला चांगला प्रतिसाद लाभला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अल्पावधीतच कोकणवासीयांच्या पसंतीस उतरलेल्या मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला आता आणखी आठ डबे जोडण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या विचाराधीन आहे. सध्या या गाडीला आठ डबे आहेत. मात्र, या गाडीला तुफान प्रतिसाद लाभत असल्याने हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आला आहे.
मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचे २७ जून रोजी उद्घाटन झाले. गेल्या तीन आठवड्यांत या गाडीला चांगला प्रतिसाद लाभला आहे. गणेशोत्सवासाठीही या गाडीचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळेच मध्य आणि कोकण रेल्वेने वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.
आसनक्षमता होणार डबल
रेल्वे बोर्डाचा मंजुरीनंतर मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आणखी डबे जोडून प्रवासी क्षमतेत वाढ होईल. आठ डब्यांच्या वंदे भारतची आसनक्षमता ५३० प्रवासी आहे, तर १६ डब्यांची वंदे भारत केल्यास आसनक्षमता १,०३० प्रवाशांपर्यंत वाढ होईल, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.