मुंबई : रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या उत्साहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएसएमटी येथून मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस आणि मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसचे मुंबईप्रमाणे शिर्डीतही ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. जोश... उत्साहाचा हा प्रवास होता.
मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस आणि मुंबई - सोलापूर वंदे भारत या दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांच्या नियमित सेवा शनिवारपासून सुरू होणार आहेत. सीएसएमटी - साईनगर शिर्डी वंदे भारत सुपरफास्ट ट्रेनच्या चेअर कारसाठी १ हजार ३०५ रुपये तर एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी २ हजार ३०५ रुपये मोजावे लागणार आहेत.
शाळेच्या मुलांना प्रवासाची संधी मध्य रेल्वेने शालेय मुलांना वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवासाची संधी दिली. सीएसएमटी रेल्वे स्थानकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारतमध्ये जाऊन मुलांशी गप्पा मारल्या. कल्याण येथील के. सी. गांधी शाळेचा विद्यार्थी श्रेयस सिंह याने सांगितले की, वंदे भारत प्रवासासाठी निबंध लेखन आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये चांगले काम करणाऱ्या मुलांना या प्रवासाची संधी मिळाली. तर याच शाळेची विद्यार्थिनी अस्मिता जोशी हिने सांगितले की, तिने वंदे भारत ट्रेनमुळे होणारे फायदे दर्शविणारे चित्र काढले होते.
असे आहेत तिकीट दर -सीएसएमटी ते साईनगर शिर्डी- चेअर कार : ८४० रु. - एक्झिक्युटिव्ह क्लास : १,६७० रु.सीएसएमटी ते सोलापूर- चेअर कार : १,०१० रु. - एक्झिक्युटिव्ह क्लास : २,०१५ रु.
‘वंदे भारत’चे वेळापत्रक -मुंबई - शिर्डी : रविवारपासून दररोज (मंगळवार वगळता) सकाळी ६.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११.४० वाजता साईनगर शिर्डीला पोहोचेल. - साईनगर, शिर्डी येथून शनिवारपासून दररोज (मंगळवार वगळता) संध्याकाळी ५.२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.५० वाजता सीएसएमटीला पोहोचेल.- या दोन्ही गाड्यांना दादर, ठाणे आणि नाशिकरोडला थांबा असणार आहेत.मुंबई - सोलापूर : शनिवारपासून दररोज (बुधवार वगळता) सायंकाळी ४.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता सोलापूरला पोहोचेल. - शनिवारपासून दररोज (गुरुवार वगळता) सोलापूर येथून सकाळी ६.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.३५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.- या गाडीला दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी थांबा असणार आहेत.