आशियातील पहिली महिला लोको पायलट सुरखा यादव यांनी सोमवारी सोलापूर ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली. त्यासाठी, गेल्या महिनाभरापासून त्या प्रशिक्षण घेत होत्या, त्यामध्ये, सिग्नलचे पालन करणे, नवीन यंत्रणांवर सरावातून हात साफ करुन घेणे, वंदे भारत ट्रेनमधील इतर चालक सहकाऱ्यासमवेत समन्वय साधणे, तसेच, ट्रेन चालवण्यासाठीच्या इतरही नियम व अटींचे पालन करणे होय.
ट्रेनच्या चालकास लोको पायलट म्हटले जाते, सोमवारी लोको पाललट बनून मूळच्या सातार कन्या असलेल्या सुरेखा यादव यांनी सोलापूर रेल्वे स्थानकाहून वेळेत प्रस्थान केलं. तर निर्धारीत वेळेपेक्षा ५ मिनिट अगोदर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठलं. यावेळी, नव्या युगातील हायस्पीड वंदे भारत रेल्वे चालवण्याची संधी आणि जबाबदारी दिल्याबद्दल रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यांनी आभारही व्यक्त केले. सुरेखा यादव यांनी १९८८ मध्ये रेल्वे विभागात नोकरी जॉईन केली. त्यावेळी, आशियातील पहिली महिला लोको पायलट होण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. आता, लोको पायलट प्रशिक्षक बनूनही त्या कार्यरत आहेत.
रेल्वे सेवेतील या कार्याबद्दल त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलंय. विशेष म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसच्या लोको पायलट बनून प्रवास पूर्ण केल्यानंतर स्वत; रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी त्याचे फोटो शेअर करत माहिती दिली. तसेच, हे भारतीय नारीशक्तीचं सशक्तीकरण असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, सध्या भारतात १० वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू असून त्यापैकी पहिल्यांदाच महिला लोको पायलट सुरेखा यांनी ट्रेन चालवली.