Join us

‘वंदे भारत’ १६० किमी वेगाने धावणार; प्रवाशांची ५० मिनिटे वाचणार, ‘या’ मार्गावर मिशन रफ्तार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 3:25 PM

Vande Bharat Express Train: वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग वाढल्याचा प्रवाशांना फायदा होणार आहे.

Vande Bharat Express Train: देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसची लोकप्रियता वाढत आहे. अमृत भारत ट्रेनही प्रवाशांच्या सेवेत आली आहे. लवकरच स्लीपर वंदे भारत ट्रेनची ट्रायल सुरू होत आहे. भारतीय रेल्वेच्या मिशन रफ्तार याचे कामही वेगाने सुरू आहे. यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस तब्बल १६० किमी वेगाने धावू शकणार आहे. यामुळे प्रवाशांची प्रवासाची जवळपास ५० मिनिटे वाचू शकतात, असा कयास आहे. 

चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस पश्चिम रेल्वेवर मिशन रफ्तार प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मिशन रफ्तारअंतर्गत मुंबई – सुरत – वडोदरा – दिल्ली आणि मुंबई – वडोदरा – अहमदाबाद या महत्त्वाच्या विभागांमध्ये रेल्वे ताशी १६० किमी वेगाने धावणार आहेत. त्यामुळे लवकरच पश्चिम रेल्वेवरील पहिली मुंबई सेंट्रल – गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस ताशी १६० किमी वेगाने धावण्यास सज्ज होणार आहे. यामुळे मुंबई ते अहमदाबाद या मार्गावरील प्रवासाचा वेळ कमीत कमी ३० ते ५० मिनिटांनी कमी करण्याचा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. तसेच मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस प्रस्तावित आहे. 

वंदे भारत, तेजस आणि शताब्दीचा प्रवास वेगवान

‘मिशन रफ्तार’ प्रकल्पासाठी अंदाजे ३,९५९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र यामुळे वंदे भारत, तेजस आणि शताब्दी एक्स्प्रेससारख्या रेल्वेगाड्यांचा प्रवास वेगवान होईल. पश्चिम रेल्वेच्या रुळाच्या दोन्ही बाजूने सुरक्षा भिंत उभारणे किंवा लोखंडी तारा लावणे सुरू आहे. यामुळे रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घटना, गुरे रेल्वे मार्गावर येण्याच्या घटना रोखता येतील. मुंबई – अहमदाबाद या ६२२ किमी रेल्वे मार्गापैकी ५६२ किमी रेल्वे मार्गावर कुंपण उभारण्यात आले आहे. उर्वरित रेल्वे मार्गावर कुंपण उभारण्याचे काम लवकरच पूर्ण होईल. या कामासाठी एकूण २६४ कोटी रुपये खर्च आला आहे. तसेच रेल्वे रूळांचे मजबूतीकरण, ओव्हर हेड वायर आणि सिग्नलिंग यंत्रणा सक्षम करण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, प्रमुख अभियांत्रिकी सुधारणांमध्ये जिओ सेलचा वापर करून पुलाचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत १२६ पुलांच्या मजबुतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई – दिल्ली रेल्वे मार्गाच्या एकूण १,३७९ किमीपैकी ५० टक्के भाग पश्चिम रेल्वेअंतर्गत येतो. साधारणपणे मुंबई सेंट्रल – नागदापर्यंत (६९४ किमी) उर्वरित भाग पश्चिम मध्य रेल्वे आणि उत्तर रेल्वेमध्ये विभागला आहे. इतर विभागीय रेल्वे देखील मार्च २०२४ अखेर ‘मिशन रफ्तार’ प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

टॅग्स :वंदे भारत एक्सप्रेस