मुंबई : पालिकेच्या विविध समित्यांमध्ये वंदे मातरम् गाण्यात यावे, अशी मागणी करणारी भाजपची ठरावाची सूचना शिक्षण समितीच्या बैठकीत मंगळवारी फेटाळण्यात आली. यापूर्वी पालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम् गीत गाण्यावरून वाद रंगला होता. त्यामुळे हे राष्ट्रीय गीत म्हणण्याची सक्ती करण्याबाबतचा निर्णय आता गटनेत्यांच्या बैठकीत होणार आहे.पालिका शाळांमध्ये आठवड्यातून दोन वेळा वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत गाण्याची सक्ती करण्यावरून रणकंदन झाले होते. पालिका शाळांमध्ये हे गीत शाळा सुटताना दररोज गायले जाते. हे गीत आता पालिकेतील समित्यांच्या बैठकांमध्येही गायले जावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक संदीप पटेल यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. ही सूचना शिक्षण समितीच्या पटलावर चर्चेसाठी मांडण्यात आली होती. मुंबई महापालिका सभेच्या कामकाजाला वंदे मातरम्ने सुरुवात करण्यात येत असून सभेची सांगता जन गण मन या राष्ट्रगीताने करण्यात येते. मात्र वंदे मातरम् सभागृहात सुरू झाल्यास समाजवादी आणि एमएमआय तसेच विरोधी पक्षातील नगरसेवकांसाठी ते अडचणीचे ठरते. त्यामुळे पालिका महासभेतच याबाबत निर्णय घेण्याची सूचना प्रशासनाने केली. त्यानुसार बुधवारी गटनेत्यांच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे. त्यानंतर महासभेतही याबाबत चर्चा होणार आहे.
वंदे मातरम् सक्तीचा ठराव फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 1:00 AM