Join us

वांद्रे पोटनिवडणुकीबाबत मतदार निरुत्साही

By admin | Published: April 05, 2015 1:37 AM

एकीकडे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रचार तापत असला तरी सर्वसामान्य मतदारांमध्ये मात्र या निवडणुकीबाबत फार उत्साह नसल्याचे चित्र दिसत आहे.

जमीर काझी ल्ल मुंबईएकीकडे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रचार तापत असला तरी सर्वसामान्य मतदारांमध्ये मात्र या निवडणुकीबाबत फार उत्साह नसल्याचे चित्र दिसत आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे राजकीय अस्तित्व निश्चित करणाऱ्या या निवडणुकीत त्यांच्यासह तीनही प्रमुख उमेदवारांनी जोमाने प्रचाराला सुरुवात केली असली तरी त्यांचे भवितव्य हाती असलेल्या मतदारराजाकडून पहिल्या टप्प्यात अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता आहे. या वेळी सेना-भाजपा युती व कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट सामना होणार आहे. दोन्ही आघाड्यांकडून आपापल्या उमेदवाराला उघडपणे समर्थन जाहीर केलेले असले तरी अंतर्गत राजकारणात मात्र वेगळीच डाळ शिजत असल्याचे दिसून येत आहे. आपण पाठिंबा दिलेला उमेदवार निवडून यावा, असे भाजपा आणि राष्ट्रवादीला मनापासून वाटत नाही. त्यातच या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून नारायण राणे यांचे राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी कॉँग्रेसमधील काही नेते प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.सेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे अवघ्या पाच महिन्यांनी पुन्हा होत असलेल्या या लढतीत त्यांच्या पत्नी व युतीच्या उमेदवार तृप्ती सावंत आणि एमआयएमचे रहेबार खान यांच्यातच लढत होईल, असे सुरुवातीला वाटत होते. मात्र कणकवलीतील धक्कादायक पराभवानंतर पुन्हा राजकारणात सक्रिय होण्यासाठी राणेंनी शड्डू ठोकल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. सेनेच्या हक्काची मराठी मते व एमआयएमकडे झुकलेली मुस्लीम व्होटबॅँक ते कितपत आपल्याकडे फिरवितात, यावरच त्यांचे भवितव्य ठरणार आहे. एकूण दहापैकी तीन प्रमुख उमेदवारांमध्ये नारायण राणे सर्वांत अनुभवी उमेदवार असले तरी त्यांना ही निवडणूक अडचणीची असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे. त्यामुळेच मराठी मते, शिवसैनिक दुखावले जाऊ नयेत, यासाठी मातोश्रीच्या परिसरातील रॅलीमध्येही ते संयमाची भाषा वापरतात; आणि त्याच वेळी मुस्लीम मतांना पुन्हा कॉँग्रेसकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व संजय निरुपम यांच्यावर अनुक्रमे त्यांची मुस्लीम व उत्तर भारतीय मतदार मिळविण्याची भिस्त आहे. त्याउलट एमआयएमच्या खासदार व आमदार ओवेसी बंधूंनी मुस्लीमबहुल वस्तीतील प्रचार सभांचा झपाटा लावत समाजाची सर्व मते वळविण्याचा चंग बांधला आहे.सेनेच्या तृप्ती सावंत यांनी पारंपरिक मराठी मतदार व भाजपाच्या मतांवर विजयाचे आराखडे निश्चित केलेले आहेत.