वनगा कुटुंबीय भाजपाचे नुकसान करणार नाहीत - मुख्यमंत्री फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 06:04 AM2018-05-06T06:04:46+5:302018-05-06T06:04:46+5:30
भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघर लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मुलालाच उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत चर्चाही झाली होती. मात्र वनगा कुटुंबीयांनी अचानक वेगळी भूमिका घेतली. भाजपाचे नुकसान होईल, असा निर्णय वनगा कुटुंबीय घेतील असे वाटत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुंबई : भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघर लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मुलालाच उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत चर्चाही झाली होती. मात्र वनगा कुटुंबीयांनी अचानक वेगळी भूमिका घेतली. भाजपाचे नुकसान होईल, असा निर्णय वनगा कुटुंबीय घेतील असे वाटत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
स्थानिक राजकारणात दिशाभूल करण्यात आल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा करत वनगा कुटुंबीयांनी शिवसेनेत प्रवेश केला.
चिंतामण वनगा यांचे पक्षासाठीचे योगदान खूपच मोठे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी अतिशय कठिण परिस्थितीत पक्ष वाढविला. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलालाच पोटनिवडणुकीत उभे करण्याचा निर्णय झाला होता. २८ एप्रिलला त्यांच्या मुलाने मला एसएमएस करून भेटण्याची इच्छा दर्शविली होती. आपण तशी भेटीची वेळ देण्याचे निर्देश कार्यालयाला दिले होते. उद्धव ठाकरेंशी देखील आपले बोलणे झाले. त्यांनीही पोटनिवडणूक जवळपास न लढविण्याचेच संकेत दिले होते. पुढील चर्चा सुभाष देसाईंशी करण्यास त्यांनी सांगितले होते. मी सुभाष देसाईंशी देखील चर्चा केली, असे फडणवीस यांनी सांगितले.