मुंबई : कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या कुटुंबातील तरुण-तरुणींना उत्सवाचा आनंद देण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या उपस्थितीत रुईया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘विद्यार्थ्यांचा राजा’चे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णकर्कश आवाजाच्या त्रासाचे विघ्न टाळण्यासाठी यंदा प्रथमच टाळ-मृदुंग आणि गणरायाच्या जयघोषात विद्यार्थ्यांच्या वारीतून विद्यार्थ्यांच्या राजाची मिरवणूक अनंत चतुर्दशीला निघणार आहे.एकीकडे मुंबई-पुणे यांसारख्या मेट्रो शहरांतील सुखवस्तू गणेशोत्सव मंडळांमध्ये मोठ्या धामधुमीत उत्सव साजरा होतो. मात्र उत्सवाच्या दिवसांतही आत्महत्याग्रस्त कुटुंबीय आर्थिक विवंचनेत असतात. यामुळे किमान उत्सवाचा आनंद मोकळेपणाने लुटता यावा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयीन तरुणांना विषम परिस्थितीची जाणीव करून त्यांच्यात माणुसकीची बीजे रोवण्यासाठी यंदा रुईया नाक्यावरील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारीतून विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. तारुण्याच्या सळसळत्या उत्साहात साजरा होत असलेला गणेशोत्सव अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. विद्यार्थ्यांच्या राजाच्या विसर्जन वारीत अकोला, अहमदनगर यांसह पश्चिम महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील तरुण-तरुणींचा सहभाग असणार आहे. ठाणे येथील माउली भजनी मंडळ यांच्या साथीने विद्यार्थ्यांची वारी मार्गस्थ होणार आहे.>मन अद्यापही चिरतरुण आहेमहाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आजी-माजी विद्यार्थ्यांची पुन्हा भेट घडावी या उद्देशाने १९७८मध्ये रुईया नाक्यावर गणेशोत्सवाची सुरुवात झाली. उत्सवात विदेशी असलेले माजी विद्यार्थीदेखील नाक्याच्या गणपतीला आवर्जून उपस्थित राहतात. दरवर्षी नवीन विद्यार्थी येत-जात असतात. मात्र जुन्याजाणत्यांपासून ते आजच्या सळसळत्या तरुणाईच्या मनात विद्यार्थ्यांच्या राजाचे स्थान अढळ आहे. वयाचे बंधन येत असले तरी उत्सव साजरा करणारे मन अद्यापही चिरतरुण आहे.- बंधन श्रॉफ, संस्थापक सदस्य, रुईया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
वारीतून होणार गणेशाचे विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 2:37 AM