Join us  

वरसावे पूलावरील वाहतूक होणार पूर्णपणे ठप्प

By admin | Published: November 05, 2016 12:04 AM

मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक 8 वरील उल्हासनदीवर 43 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वरसावे पूलाची दुरुस्तीवर अखेर पडदा पडला असून दुरुस्तीला

ऑनलाइन लोकमत/राजू काळे 

भाईंदर, दि. 04  -  मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक 8 वरील उल्हासनदीवर 43 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वरसावे पूलाची  दुरुस्तीवर अखेर पडदा पडला असून दुरुस्तीला 15 नोव्हेंबरपासून सुरुवात करण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) घेतला आहे. या दुरुस्ती दरम्यान पुलावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होणार आहे. त्यामुळे वरसावे वाहतूक बेटावर प्रचंड वाहतूक कोंडी उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
महाड येथे घडलेल्या पूल दुर्घटनेमुळे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील एनएचएआयने बांधलेल्या जुन्या पुलांचे स्ट्रक्टरल ऑडिट करण्यास सुरुवात केली. त्यापैकी मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक 8 वरील वरसावे पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटला 3 सप्टेंबरपासून सुरुवात केली. गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या अहवालात पुलाच्या वरसावे बाजूकडील चौथ्या क्रमांकाच्या 114 मीटर लांबीच्या गर्डरला तीन तडे गेल्याचे नमूद करण्यात आले. परंतु, एनएचएआय तसेच पुलाचे बांधकाम करणाऱ्या गॅमन इंडिया या कंपनीकडे पुलाचा मास्टर प्लान उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. तत्पूर्वी 2013 मध्ये एका गर्डरला गेलेल्या तड्याची दुरुस्ती करणाऱ्या आयडियल रोड बिल्डर (आयआरबी) कंपनीकडेही पुलाचा बांधकाम नकाशा प्राप्त न झाल्याने पुलाची दुरुस्ती नेमकी कशी व कुठून करायची, असा यक्ष प्रश्न एनएचएआयसमोर उभा राहिला. गेल्या 22 सेप्टेंबरपासून सुरु असलेला नकाशाचा शोध मोहिमेत सुमारे 200 हुन अधिक नकाशे  प्राप्त  झाले. त्यापैकी केवळ 10 ते 12नकाशेच फायदेशीर ठरले. यानंतरही दुरुस्ती कशापद्धतीने करायची यावर घोडे अडले. या दुरुस्तीच्या जरतर मध्ये एनएचएआयच्या सूचनेनुसार या पुलावरील अवजड वाहतूक गेल्या दिड महिन्यांपासून बंद करण्यात आल्याने पुलाच्या दोन्ही बाजूस मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ठराविक अंतराने एका बाजूची वाहतूक सोडण्यात येत असल्याने वाहनांना सुमारे दिड ते दोन तास वाहतूक कोंडीत खोळंबून रहावे लागत आहे. यावर पर्याय म्हणून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवरील दापचरी, नाशिकरोड, वाडा -भिवंडीरोड आदी ठिकाणी गुजरात व मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहने टप्प्या-टप्प्याने सोडण्याकरिता वाहनतळ निर्माण केली. त्यामुळे वाहतूक कोंडीचे नियोजन काही अंशी सुसह्य झाल्याचे एनएचएआयच्या सुत्रांकडुन सांगण्यात येत आहे. दरम्यान भारतातील पूल तज्ञ डॉ. वीरेंद्र कुमार रैना यांच्या पथकाने केलेल्या तपासणीअंती एनएचएआयने ब्रिटनमधील मेसर्स रॅम्बोल या बांधकाम कंपनीला पुलाच्या दुरुस्तीचे कंत्राट दिले. या कंपनीच्या तज्ञांनी3 ऑक्टोबरला पुलाची तपासणी करून  आयआरबीला सल्लागार म्हणून नियुक्त केले. दुरुतीचा निर्णय अंतिम टप्प्यात असताना पुलाच्या ज्या भागांना तडे गेले आहेत, त्या भागांची अद्यावत सखोल तपासणी करण्यासाठी भारतातील ए. ई. अँड सी इंनोवटिंग कन्स्ट्रक्शन या खाजगी कंपनीला नियुक्त आहे. येत्या दोन दिवसांत तपासणीची पूर्ण होणार आहे. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून दुरुस्तीच्या चर्चेत असलेल्या या पुलाच्या दुरुस्तीला 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असल्याचे एनएचएआयकडून सांगण्यात आले. दुरुस्तीच्या कालावधीत हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याने वाहतूक कोंडीत प्रचंड भर पडणार आहे. त्याच्या नियोजनासाठी 24 तास वाहतूक विभागासह स्थानिक वाहतूक शाखा, स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचारी व ट्राफिक वार्डन अशा सुमारे 100 हुन अधिक कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असल्याचे स्थानिक वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक विलास चौगुले यांनी सांगितले. पुलाच्या दुरुस्तीसाठी अंदाजे दिड महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुरुस्तीदरम्यान वाहनचालकांनी ठाणे येथून गुजरातकडे तसेच गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी माजिवडा जंकशन, माणकोली नाका, अंजूर फाटा, चिंचोटी व मनोर मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पालघर व ठाणे जिल्हाप्रशासनाने केले आहे.