वरावरा राव यांचा नानावटी रुग्णालयात ७ जानेवारीपर्यंत मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:07 AM2020-12-22T04:07:09+5:302020-12-22T04:07:09+5:30
वरावरा राव यांचा नानावटी रुग्णालयात ७ जानेवारीपर्यंत मुक्काम वरावरा राव यांचा नानावटी रुग्णालयात ७ जानेवारीपर्यंत मुक्काम एल्गार परिषद लोकमत ...
वरावरा राव यांचा नानावटी रुग्णालयात ७ जानेवारीपर्यंत मुक्काम
वरावरा राव यांचा नानावटी रुग्णालयात ७ जानेवारीपर्यंत मुक्काम
एल्गार परिषद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एल्गार परिषदप्रकरणी आरोपी असलेले ज्येष्ठ विचारवंत व कवी वरावरा राव यांना ७ जानेवारी, २०२१ पर्यंत नानावटी रुग्णालयातून न हलविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी दिले.
उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे गेल्या महिन्यात वरावरा राव यांना नानावटी रुग्णालयात वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. न्या.एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने सोमवारच्या सुनावणीत राज्य सरकारला राव यांना ७ जानेवारीपर्यंत नानावटी रुग्णालयातून न हलविण्याचे निर्देश दिले, तसेच पुढील सुनावणीत राव यांचे नवीन वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देशही राज्य सरकारला दिले.
राव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे राव यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील आनंद ग्रोव्हर यांनी न्यायालयाला सांगितले. राव यांच्या मुलीच्या वतीने ग्रोव्हर यांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांच्यावर करण्यात येत असलेल्या उपचाराबाबत कुटुंबीय समाधानी आहेत.
दरम्यान, राज्य सरकार व एनआयएने राव यांची प्रकृती चांगली असल्याने, त्यांना तळोजा कारागृहात पाठविण्यात यावे किंवा जे.जे. या सरकारी रुग्णालयात दाखल करावे, अशी विनंती उच्च न्यायालयाला केली. न्यायालयाने राज्य सरकार व एनआयएची ही विनंती फेटाळली. राव यांचे सध्याचे वैद्यकीय अहवाल पाहिल्याशिवाय आम्ही त्यांना कारागृहात पाठविणे अशक्य आहे. कदाचित पुढच्या सुनावणीत पाठवू. जुन्या वैद्यकीय अहवालांवर अवलंबून राहून आम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही, असे न्या. शिंदे यांनी म्हटले.
............................