Join us

‘जेजे’मध्ये १४ निवासी डॉक्टर, विद्यार्थी मलेरिया, डेंग्यूने आजारी; वाढले डासांचे प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 5:28 AM

जेजे रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

मुंबई : जेजे रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा परिणाम थेट त्या रुग्णालयात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि निवासी डॉक्टरांच्या आरोग्यावर झाला असून, १४ निवासी डॉक्टरांना मलेरिया आणि डेंग्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘लोकमत’कडे या १४ जणांच्या नावांची यादी आहे. मात्र जेजेचे प्रशासन याविषयी कमालीची गुप्तता बाळगत आहे. 

जेजे रुग्णालय परिसरात सुपरस्पेशालिटी बिल्डिंग, ३०० निवासी वसतिगृह आणि अन्य किरकोळ बांधकाम गेले अनेक दिवस सुरू आहे. या परिसरात पदव्युत्तर आणि पदवी विद्यार्थ्यांचे ६ हॉस्टेल आहेत. त्यामध्ये आर. एम. भट बॉइज हॉस्टेल, अपना बॉइज हॉस्टेल, ओल्ड बॉइज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल या ठिकाणी ( पदवीचे ) एमबीबीएसमध्ये शिकणारे विद्यार्थी राहतात, तर ३०० रेसिडेंट हॉस्टेल आणि बीएमएस क्वार्टर हॉस्टेल या ठिकाणी पदव्युत्तर विद्यार्थी राहतात. सर्वसाधारण ९०० ते १००० विद्यार्थी या ठिकाणी एकावेळी राहतात.

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या परिसरात ड्रेनेजची लाइन फुटली होती. तसेच इमारतींचे बांधकाम सुरू असल्याने या ठिकाणी डासांचा वावर वाढला आहे. त्यामुळेसुद्धा मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढू शकतात.

दाेघांना लागण झाल्याची वरिष्ठांची माहिती

एमबीबीएस इंटर्न मयूर बावनकर, एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला शिकणारा निनाद कांबळे यांना वॉर्ड सातमध्ये दाखल केले असून त्यांना डेंग्यू झाल्याचे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ‘एक दोन विद्यार्थ्यांना ताप आल्याच्या घटना परिसरात असतात. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपचारासाठी दाखल झालेले नाहीत.’

डेंग्यू, मलेरिया वाढल्याची पालिकेची आकडेवारी

पावसाचे दिवस सुरू असल्याने संपूर्ण मुंबईतच साथीच्या आजाराचे रुग्ण दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील साथीच्या आजाराची आकडेवारी जाहीर केली होती. त्यात ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले होते.

गेल्या महिनाभरात विविध विभागातील एक-दोन निवासी डॉक्टरांना डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टो आजाराचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

- डॉ. शुभम सोहनी, अध्यक्ष, निवासी डॉक्टर संघटना, जे जे रुग्णालय