मुंबई : राज्यासह देशावर कोरोनाचे संकट आले असताना या काळात सेवाभावी संस्था, गणेशोत्सव मंडळे, विविध तरुणांच्या गटांनी विविध प्रकारे गरजूंना मदत सुरू केली आहे. सुरक्षेचे सर्व नियम पाळून या सामाजिक मोहिमा सुरू असून जनजागृती, रक्तदान, मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीसाठी योगदान गरजू लोकांना जेवणापासून गस्तीवरील पोलिसांसाठी पाण्याची सोय करण्यापर्यंत विविध प्रकारे ही मंडळी आपले योगदान देत आहेत.
मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मुंबईतील सर्व छोट्या- मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येत कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी मंडळांना मदतीचा हात पुढे करण्याची साद बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने दिली होती. या आवाहनानुसार गणेशोत्सव मंडळांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मोठ्या रकमेचे धनादेश दिले. आताही मुंबईतील अनेक मंडळे पुढे येऊन विविध सेवाभावी उपक्रम राबवत गरजूंना मदतीचा हात पुढे करत आहेत, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री निधीला मदत : गेल्याच आठवड्यात काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शक्य ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली होती. आता आणखी गणेशोत्सव मंडळांनी पुढे येत मुख्यमंत्री सहाय्यता निधी देत आहेत. यामध्ये परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (नरेपार्क) (१ लाख रूपये), बालविकास मित्र मंडळ (१ लाख रुपये), राममारुती रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (५१ हजार), बाल गणेश मंडळ (बालगणेशचा बल्लाळेश्वर) (५१ हजार), ओम साई महेश पार्क मित्र मंडळ (३१ हजार), ग. द आंबेकर मार्ग काळेवाडी (काळेवाडीचा विघ्नहर्ता) (२५ हजार), परळ विभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ (५१ हजार), बालक मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (५ हजार ५५५)
काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे (काळाचौकीचा महागणपती) मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयाची देणगी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर मंडळाकडून विभागातील दानशूरांना निधीसाठी आवाहन केले. या आवाहनानंतर लोकसहभागातून तब्बल २,०२,६६० रुपये जमा करण्यात आले. रविवारी, मंडळाने एकूण ३ लाख ०२ हजार ६६० रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीत जमा केला आहे.
विविध मंडळे, सेवाभावी संस्थाही सरसावल्या : पूर्व उपनगरांतील साईभजन सेवा मंडळ, संकल्प फाउंडेशन, विजय साउंड, देवाक काळजी फाऊंडेशन आदी अनेक सेवाभावी संस्थांकडून विविध माध्यमातून मदत केली जात आहे. तर साईभजन सेवा मंडळातर्फे गरजू लोकांसाठी तयार जेवणाची पाकिटे वाटण्यात येत आहेत. मुलुंडच्या दीनदयाळ नगरात सहा इमारतींमध्ये समाजसेवक दीपक सावंत यांच्यातर्फे पालिकेच्या साहाय्याने जंतुनाशक फवारणी करून देण्यात आली, तर साफियाबाई चाळ मंडळातर्फे सुरक्षेसाठी तैनात पोलिसांना पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच, महामार्गावर आसरा घेतलेल्या गरजू लोकांमध्ये जेवणाचे वाटप करण्यात आले.